Wednesday, 31 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला संसदेची मंजुरी; तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद
Ø  धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
Ø  राज्यातल्या उपसरपंचांनाही आता दरमहा मानधन तर सरपंचांच्या मानधनात दुपटीहून अधिक वाढ
Ø  पश्चिम वाहिनी नद्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठीच्या नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून सरकारची तत्त्वत: मान्यता
Ø  काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
आणि
Ø  मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भिज पाऊस
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेपाठोपाठ काल राज्यसभेतही ते संमत झालं. विधेयकाच्या बाजूने नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौऱ्याऐंशी मतं पडली. मुस्लिम पुरुषानं, पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, वायएसआर काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीसह विरोधी पक्षांनी विरोध दर्शवत, हे विधेयक संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी केली होती. संयुक्त जनता दलानं मात्र या विधेयकावरच्या चर्चेत भाग न घेता, सभात्याग केला.

 दरम्यान, लोकसभेनं काल ग्राहक हितसंरक्षण विधेयक २०१९ला मंजूरी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोग नेमण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****

 अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातल्या धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनांमध्ये भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातल्या भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्यांना स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, ग्रामीण भागातल्या बेघर कुटुंबांना पहिल्या टप्यात १० हजार घरकुलं बांधून देणे, आवश्यक परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध योजना राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना राबण्यासह १३ विविध योजनांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षापासून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****

 राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर सरपंचांचं सध्याचं मानधन वाढवण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा १ जुलैपासून लाभ मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार हे मानधन देण्यात येणार असून दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावाच्या सरपंचाचं मानधन एक हजारांऐवजी तीन हजार, २००१ ते ८ हजार लोकसंख्येसाठी पंधराशे रूपयांच्या ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सरपंचाच्या मानधनात दोन हजार ऐवजी पाच हजार रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. उपसरपंचांचं मानधन अशाच पद्धतीनं लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक हजार, पंधराशे आणि दोन हजार रूपये दरमहा देण्यात येणार आहे.
****

 पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याकरता, नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यासही मंत्रीमंडळानं काल तत्त्वत: मान्यता दिली. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचा यात समावेश आहे. या नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खोऱ्यातल्या मराठवाडा भागात २६ अब्ज घनफूट, तापी खोऱ्यासाठी १० अब्ज घनफूट आणि मुंबई शहरासाठी ३० अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.  कोकणातल्या नार-पार, दमणगंगा, उल्हास आणि वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातल्या गोदावरी नदी खोऱ्यात हे पाणी वळवण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करून हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

 याशिवाय बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण - महाज्योती संस्थेची स्थापना करण्यास, मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यास, ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या परिरक्षा धोरण आणि सुपर थर्टी या हिंदी चित्रपटास वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत करमुक्त करण्यालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी काल विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपले सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले. यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड, ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि मुंबईतल्या वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
****

 पिक विमा योजनेत नुकसान भरपाई ही मागील पाच वर्षांतल्या सर्वाधिक उत्पादनावर आधारलेली असावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. या योजनेतल्या त्रुटींसंदर्भात काल शिवसेना खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी सांगितलं.
****

 मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून भिज पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात संततधार सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे. परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.

 कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा, तसंच कागल तालुक्यातली वाहतुक यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे, जिल्ह्यात सर्वत्र नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आले आहेत. अंबा नदीचं पाणी पुन्हा नागोठण्यात घुसलं आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना सावध राहण्याचा प्रशासनानं इशारा दिला आहे.

 गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे भामरागड इथल्या सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी अर्जुन खोतकर या जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
****

 अंबाजोगाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना २०१८ -१९ या वर्षीचा सोयाबीन पीक विमा योजनेचे पैसे तात्काळ देण्यात यावेत, ग्रामीण भागात पिण्याचं पाणी उपलब्ध करून गुरांच्या छावण्या सुरू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी अंबाजोगाई इथं काल मोर्चा काढला. माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती राजेदेशमुख यांच्या नेतृत्वात भर पावसात निघालेल्या या मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
****

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या खुल्या प्रवर्गातल्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम  अर्थात एमबीबीएसच्या जागा वाढवण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विविध घटकांच्या आरक्षणांमुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांमध्ये यावर्षी मोठी घट झाली असून या अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता गुण छाटणीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पात्र विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून वंचित राहत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
*****
***

No comments: