Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
रात्रीचा दिवस करून,
सर्व तांत्रिक प्रश्न सोडवून चांद्रयान-२ विक्रमी वेळेत अवकाशात सोडणारे भारतीय वैज्ञानिक
सर्वश्रेष्ठ, जागतिक दर्जाचे असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काढले. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात
आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. तरुणांसाठी अंतराळाशी संबंधित कुतूहल, भारताची
अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धेची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला या स्पर्धेचा तपशील दिला जाईल. या स्पर्धेत प्रत्येक
राज्यातनं सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, सप्टेंबरमध्ये जेव्हा चांद्रयान
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्या क्षणाचा श्री हरिकोटा येथून साक्षीदार होण्याची
संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या देशाचं सौंदर्य
पाहण्यासाठी आणि आपल्या देशातल्या लोकांची भावना समजून घेण्यासाठी पर्यटन आणि तीर्थयात्रा
यापेक्षा मोठा शिक्षक नाही. त्यामुळे ज्या भागांमध्ये पावसाळ्यातलं नैसर्गिक सौंदर्य
पाहण्यासारखं असतं, अशा भागांमध्ये आवर्जून जावं, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं. त्याचबरोबर भारत छोडो आंदोलनाची स्मृती घेऊन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनही
लोकांनी कल्पक पद्धतींनी साजरा करावा, असं ते म्हणाले.
****
आज जागतिक हिपॅटायटीस-बी,
कावीळ-ब प्रतिबंध दिवस आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने दरवर्षी २८ जुलै रोजी
हा दिवस साजरा केला जातो. पोलिओप्रमाणेच देशाला या आजारापासून मुक्त करण्यासाठी, काविळीचा
संसर्ग रोखण्यासाठी व्यापक मोहिमेवर भर देण्याचं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी
केलं. नवी दिल्ली इथं एका रूग्णालयात वर्षभर चालणाऱ्या मोहिमेचं उद्घाटन करताना ते
बोलत होते. सर्व खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात रोग, त्याची कारणं आणि प्रतिबंधाविषयी
जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्री
डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही या रोगाविरुध्द जनतेला
एकत्रित येऊन लढा देण्याचं आवाहन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या
२४ तासांत केवळ २ पूर्णांक ८ मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं
आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू असून, गोदावरी नदीवरचं गंगापूर धरण ७४
टक्के भरलं आहे. तसंच दारणा, कडवा, भावली या धरणांतूनही नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात
आला आहे. काल दुपारनंतर नांदूर - मधमेश्वर धरणातून २४ हजार क्यूसेक वेगानं सोडण्यात
आलेलं पाणी आज पहाटे गंगापूर तालुक्यातल्या कायगाव इथं जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
पोहोचल्याचं वृत्त आहे. तर, नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी 13 पूर्णांक
87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
कृष्णा नदीच्या खोऱ्यात
दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे वारणा आणि कोयना धरणातली पाणी पातळी
वाढली आहे. दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्णपणे भरत आले असून, पाऊस असाच राहिल्यास
सांगलीला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना आणि वारणा धरण परिसरात गेल्या
चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. कोयना धरणात तीन हजार १९९ प्रतिसेकंद घनफूट, तर वारणा धरणात दोन हजार ३३८ प्रतिसेकंद घनफूट पाण्याची आवक सुरू आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास
वारणा धरण चार दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या
५७ व्या दिवशी सातही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. या मोसमातली
ही पहिलीच अतिवृष्टी ठरली असून, जिल्ह्यात २४ तासांत ३१ पूर्णांक ८ मिलिमीटर पाऊस कोसळला.
चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ६२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
****
अलिबाग इथं पोलादपूर
तालुक्यातल्या कुडपण इथल्या राजेंद्र शेलार या तरुणाचा काल रात्री नदीपात्रात बुडून
मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला असून, शवविच्छेदनासाठी पोलादपूरला पाठविण्यात आला
आहे. काल एकाच दिवसात पावसाचे चार बळी गेल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment