Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
मुस्लिम महिला विवाह
संरक्षण विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी हे विधेयक सदनासमोर मांडलं. या विधेयकाकडे राजकारणाच्या चष्म्यातून न पाहता,
माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहावं, असं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी केलं. काँग्रेसच्या
डॉ ॲमी याज्ञिक यांनी, या विधेयकावरच्या चर्चेत भाग घेताना, सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी
तलाक बेकायदा असल्याचा निर्णय दिलेला असताना, हे विधेयक आणणं कायद्याच्या चौकटीत बसत
नसल्याचं सांगितलं.
केंद्रीय मंत्री मुख्तार
अब्बास नक्वी यांनी, हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिक बळकटी देईल,
असा विश्वास व्यक्त केला. तिहेरी तलाक देण्याचा विचारही विवाहित मुस्लिम पुरुषाच्या
मनात येऊ नये, यासाठी या विधेयकात कारावासाची तरतूद ठेवली असल्याचं नक्वी यांनी सांगितलं.
****
उत्तरप्रदेशातल्या उन्नाव
लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडितेच्या रस्ता अपघाताचे पडसाद आज लोकसभेत उमटले. काँग्रेससह
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सदनाचं कामकाज सुरू होताच, हा मुद्दा उपस्थित करत, घोषणाबाजी
सुरू केली. भाजपाचे जगदंबिका पाल तसंच साध्वी निरंजन ज्योती यांनी, हा विरोधकांचा सरकारला
बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. संबंधित अपघातातला ट्रक समाजवादी पक्षाच्या
बड्या नेत्याचा असून. ट्रकचालकही समाजवादी पक्षाचा पदाधिकारी असल्याचं, या दोघा नेत्यांनी
सदनात सांगितलं. त्यानंतही गदारोळ सुरू होता. अध्यक्षांनी या गदारोळातच ग्राहक संरक्षण
विधेयक २०१९ चर्चेला घेतलं. या चर्चेदरम्यानही विरोधकांचा गदारोळ सुरू होता. यावर राज्य
सरकारशी निगडित मुद्दे संसदेत उपस्थित करायचे नाहीत, असा निर्णय सर्व सदस्यांनी मिळून
घेतलेला आहे, याचं अध्यक्षांनी स्मरण करून दिलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश रथयात्रेला परवा, अमरावती जिल्ह्यात गुरुकुंज
मोझरी इथून प्रारंभ होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते या रथयात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित
या रथयात्रेचा महिनाभरानंतर नाशिक इथं समारोप होईल.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी कोलकाता इथं पोहोचणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या
नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन, ते निवडणूक
सुधारणा, मतपत्रिकांवर मतदान तसंच देशातल्या राजकारणाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्याची
शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
****
ठाणे जिल्ह्यात आज सकाळी
भूस्खलन होऊन पितापुत्राचा मृत्यू झाला. कळवा उपनगरात एका टेकडीचा भाग चाळीच्या भिंतीवर
कोसळून हा अपघात झाला. या प्रकरणात एक महिला गंभीर जखमी झाली असून, या चाळीतून ७० जणांना
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
दरम्यान,
सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी झालेल्या
पावसामुळे ज्या लोकांच्या घराचं नुकसान झालं, अशा लोकांना राज्य सरकार पुरेशी नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कल्याण जवळ मुरबाड इथं आयोजित
कार्यक्रमात ते काल बोलत होते. पुरामुळे घरांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून, गरज भासल्यास नवीन
नियमांनुसार भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसामुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी
या व्यतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असंही मुख्यमंत्री
म्हणाले.
****
मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी
कोसळल्या. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात काल हलका
पाऊस झाला. औरंगाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. नांदेड
जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी दोन तास चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ७८
बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा, तसंच कागल तालुक्यातली
वाहतुक यामुळे मोठ्याप्रमाणावर विस्कळीत झाली. नृसिंहवाडी इथं कृष्णा नदी काठावर असलेल्या
दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा साजरा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय क्रिकेट
संघ‘वेस्ट इंडीज दौऱ्याच्या प्रतीक्षेत असल्याचं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानी
म्हटलं आहे. काल संध्याकाळी
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment