Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
27
July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
वस्तू
आणि सेवा कर परिषदेनं इलेक्ट्रीकल वाहनांवरील जी एस टी १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत
कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. तसंच इलेक्ट्रीकल वाहनांच्या चार्जरवरील जी एस टी देखील १८ टक्क्यांवरून
पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर स्थानिक प्रशासनानं इलेक्ट्रीकल
वाहने भाडे तत्वावर घेतल्यास त्यांना जी एस टी मधून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री
निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जी
एस टी दर कपातीचे फायदे ग्राहकांना न देणाऱ्या संस्थांवर दहा टक्के दंड ठोठावण्याचा
निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
जम्मू-कश्मीरमध्ये
शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा
कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक असलेला मुन्ना लाहोरी ठार झाला. अत्याधुनिक स्फोटकं तयार
करण्यात तो कुशल होता आणि काश्मीरच्या दक्षिणेकडच्या भागात दहशतवाद्यांची भरती करण्याचं
काम तो करत होता. अनेक नागरिकांना ठार करण्यातही त्याचा हात होता, असं पोलिसांनी सांगितलं.
या चकमकीत झीनातुन इस्लाम नावाचा स्थानिक दहशतवादी देखील मारला गेला आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये
कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलानं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे
लष्कराचा एक जवान शहीद झाला. आज सकाळपासून या भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करून
गोळीबार सुरू होता. या गोळीबारात जखमी झालेला हा जवान उपचारांदरम्यान मरण पावला. लष्करानं
या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.
****
महिलांचा
सन्मान करणं ही आपली परंपरा असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा
निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या
नायडू यांनी केलं आहे.
राज्य
निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती नायडू यांच्या
हस्ते आज मुंबई इथं प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. २०१६ आणि २०१७ या कालावधीत
पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात
पुढाकार घेतल्याबद्दल एकूण १४ विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात
आले.
निवडणुकांमध्ये
राखीव जागा उपलब्ध झाल्यामुळे विविध स्तरातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची
संधी मिळाली. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद
करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी नायडु यावेळी व्यक्त केली.
****
मागास
भागातली व्यक्ती उच्च पदापर्यंत मजल मारू शकते. त्यासाठी उच्च ध्येय आणि त्या ध्येयासाठी
धडपड करणं आवश्यक आहे, त्यातूनच यश मिळतं, असं प्रतिपादन महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या
कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. बानुमती यांनी केलं आहे.
औरंगाबाद
जवळच्या कांचनवाडी इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शिलान्यास समारंभ
कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांचं कायदेविषयक शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं. या शिक्षणाबरोबरच
इंटर्नशिप, कॅम्पस मुलाखत, संवाद कौशल्य यावर भर असावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
वांगणी
इथं महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या सर्वच लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं
आहे. त्यात नऊ गरोदर महिलांचा देखील समावेश आहे. या प्रवाशांसाठी ३७ डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही
तैनात करण्यात आल्या असून, त्यात स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश आहे.
एनडीआरएफच्या
आठ, नौदलाच्या चार तसंच लष्कराच्या दोन तुकड्या आणि भारतीय हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सच्या
सहाय्यानं सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळवलं आलं. लष्कराच्या आणखी दोन तुकड्या
मार्गात असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
दरम्यान,
या एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
या प्रकरणी प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
****
संपूर्ण
कोकणात पावसानं थैमान मांडलं असताना दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाचा
जोर ओसरला आहे. आज पहाटे पासून पावसानं विश्रांती घेतली असून काही ठिकाणी सूर्यदर्शन
सुद्धा झालं. आज सकाळी आठ वाजता नोंद झाल्याप्रमाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५१ पूर्णांक
तीन मिलिमीटरच्या सरासरीनं एकूण ४१० पूर्णांक ४० मिलीमीटर पाऊस पडला.
****
गडचिरोली
जिल्ह्यात १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं कालपासून जोरदार हजेरी लावली.
****
No comments:
Post a Comment