Monday, 29 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  29 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

         मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका जलद सुनावणीला घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आधारावर शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण दिलं होतं. यामुळे राज्यात आरक्षणाचं प्रमाण, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या पन्नास टक्के मर्यादेपेक्षा अधिक होत होतं. काही अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा वाढू शकते, असं मुंबई उच्च न्यायालयानं, यासंदर्भात निर्णय देताना नमूद केलं होतं. त्यानंतर या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या पाच याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाल्या आहेत.
****

         समाजवादी पक्षाचे खासदार आझम खानी यांनी, लोकसभेच्या तालिका अध्यक्षांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आज सदनाची माफी मागितली. मात्र खान यांचे काही शब्द ऐकू न आल्यानं, माफीच्या वाक्यांचा पुनरुच्चार करावा, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणताच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खान यांची बाजू सावरून घेताना, उन्नाव प्रकरणातल्या पीडितेच्या काल झालेल्या अपघाताचा मुद्दा उपस्थित केला, त्यावरून सदनात काही काळ गदारोळ झाला.

         राज्यसभेत आज दिवंगत माजी मंत्री जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव वाचून दाखवला. सर्व सदस्यांनी दोन मिनिटं मौन पाळून रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली.

         इंडोनेशिया इथं २३व्या अध्यक्षीय मुष्टीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल राज्यसभेनं, सदनाच्या सन्माननीय सदस्य एम. सी. मेरी कोम यांचं अभिनंदन केलं. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सदनानं आनंद व्यक्त केला.
****

         कर्नाटकात मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी विश्वासमत ठराव आवाजी मतदानानं जिंकला. सतरा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवल्यामुळे सदनातल्या सदस्यांची संख्या २२५ वरून २०८ झाली, त्यामुळे बहुमताचा आकडाही ११३ वरून एकशे पाच झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

         दरम्यान, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
****

 शेतकरी तसंच सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाव्दारे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येतं असल्याचं, कृषी मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं अंबादेवी पालखी मार्गाचं काँक्रीटीकरण आणि विद्युतीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रधानमंत्री किसान विकास योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून, राज्य सरकार सामान्य जनतेच्या विकासासाठी कार्यरत असल्यचंही ते म्हणाले. लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासाच्या प्रश्नांसोबतच शेतकरी हिताचे प्रश्न सोडवण्यासाठीही पुढे यावं, असं आवाहन बोंडे यांनी यावेळी केलं.
****

 राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अमरावती इथल्या सिपना नदीचं पाणी दूनी गावात शिरलं असुन, नदी काठावरच्या सुमारे २५ गावांना धोका निर्माण झाला आहे. पूरपरिस्थिती हाताळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील 14 सदस्यांचं पथक धारणी इथं आवश्यक साहित्यासह पाठवण्यात आलं आहे. धारणी लगत भोकरबर्डी च्या आमनेर किल्याजवळील तापी नदीला मोठा पूर आला असून, 20 वर्षाचा पुराचा विक्रम मोडला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं गेल्या दोन दिवसात ७ जणांचे बळी गेले असून पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. रोहा तालुक्यात वरसगाव इथं एक तरूण तलावात बुडाला तर अंबा नदीत एक तरुण वाहून गेला. दोघांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.

 जळगाच जिल्ह्यात तापी नदीवरच्या हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, तापी नदी पात्रात सुमारे बहात्तर हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
 नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे या जिल्ह्यातल्या धरणातला पाणीसाठा वाढला आहे.
*****
***

No comments: