Tuesday, 23 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  23 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानच्या सहमतीनं चर्चेत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. या मुद्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.

 राज्यसभेत काँग्रेसचे आनंद शर्मा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा, आणि अनेक सदस्यांनी, पंतप्रधानांनी या मुद्यावर सदनात निवेदन करण्याची मागणी केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी, ट्रम्प यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देत, पंतप्रधानांनी मध्यस्थीसाठी कधीही अमेरिकेकडे विचारणा केली नसल्याचं सांगितलं. भारत या प्रश्नावर थेट पाकिस्तानशी द्वी पक्षीय चर्चा करेल, मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद थांबणं आवश्यक असल्याचं, नमूद केलं.

मात्र या नंतरही विरोधकांचं समाधान न झाल्यानं, सदनात गदारोळ सुरू झाला. सभापतींच्या आवाहनानंतरही गदारोळ न थांबल्यानं, सभापतींनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधी सदस्यांनी पंतप्रधानांनी या प्रश्नी खुलासा करण्याची मागणी करत, गदारोळ सुरूच ठेवला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, विरोधी सदस्यांची ही भूमिका अनाठायी असल्याचं सांगत, सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणू नये, असं आवाहन केलं. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं

 लोकसभेचं कामकाज सुरू होताच, विरोधी सदस्यांनी याच मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी हा मुद्दा शून्य काळात उपस्थित करण्यास सांगत, प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यानंतर शून्यकाळात काँग्रेसचे मनीष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, द्रमुकचे टी आर बालू, यांच्यासह विरोधी सदस्यांनी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनात येऊन, खुलासा करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना अशी कोणतीही विनंती केली नसल्याचं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेतही सांगितलं. पाकिस्तान सोबत या मुद्यावर फक्त द्वी पक्षीय चर्चा होणार असल्याचं, जयशंकर यांनी स्पष्ट केलं. मात्र काँग्रेससह विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी या मुद्यावरून सभात्याग केला.
****

 महिला किसान सशक्तीकरण योजनेचा आतापर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक महिलांना लाभ झाला असून, आणखी ३४ लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. नंदूरबारच्या खासदार हीना गावीत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

 महिलांच्या स्वयंसहायता गटांना सुलभ कर्जाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जात असून, या गटांकडून कर्ज परतफेडीचं प्रमाण सुमारे ९८ टक्के असून, साधारण दोन टक्के कर्जाची परतफेड होत नसल्याचं, तोमर यांनी सांगितलं.
****

 संसदेच्या चालू अधिवेशनाचा कार्यकाळ दोन आठवड्यांनी वाढवण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे. आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी याचे संकेत दिले. याबाबत निर्णय झाल्यावर तो अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असं जोशी यांनी सांगितलं.
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना, आपल्या विरोधातल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्यानं, त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
****

 देशभरातल्या २१ केंद्रीय विद्यालयाच्या इमारती असुरक्षित असल्याचं एका पाहणीत आढळलं आहे. या इमारतींमध्ये शाळा चालवू नसेत, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिले आहेत. या २१ विद्यालयांपैकी सर्वाधिक आठ धोकादायक इमारती महाराष्ट्रातल्या केंद्रीय विद्यालयांच्या असून, त्यापैकी तीन विद्यालयांच्या इमारतींचं बांधकाम १९६० च्या दशकात झालेलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या पैकी चार विद्यालयांच्या इमारती नव्यानं बांधण्यासाठी मंजूरी मिळाली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

 छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी भेज्जी इथं ही चकमक झाली असून ठार झालेल्या नक्षलवाद्यावर पोलिसांकडून एक लाख रूपयाचं इनाम जाहीर करण्यात आला होतं, असं पीटीआयचं वृत्त आहे.
****

 झाडे लावा - झाडे जगवा मोहीम पुन्हा सक्रीय करण्याची गरज असल्याचं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद इथं कांचनवाडी परिसरात पाच हजार वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ करतांना ते बोलत होते.
*****
***

No comments: