Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
मुंबई शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस;
मराठवाड्याच्या
अनेक भागात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याची आशा
Ø भारतीय जनता पक्षाचे नेते बी एस येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री
Ø गैरव्यवहार आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या
पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित
आणि
Ø माजी मंत्री
शंकरराव राख यांचं निधन
****
मुंबई शहरात पहाटेपासून
मुसळधार पाऊस सुरू असून याचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. कोकणाच्या विविध भागातही
जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री चांगला पाऊस
झाला. मराठवाड्यातही काल ठिकठिकाणी
चांगला पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात गेले दोन दिवस भीज पाऊस झाला, किनवट, हिमायतनगर
, हदगाव, कंधार या भागात पावसाचा जोर होता,
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा, येणेगूर परिसरातही
पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून
काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. जालना शहरासह
जाफराबाद, टेंभूर्णी, मंठा, भोकरदन , हसनाबाद या ठिकाणीही हलका ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस
झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे या भागातल्या
पिकांना जीवदान मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
पुढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान
विभागानं दिले आहेत.
****
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे
नेते बी एस येडियुरप्पा यांनी काल चौथ्यांदाचा शपथ घेतली. राज्यपाल
वजूभाई वाला यांनी त्यांना पदाच्या गोपनियतेची शपथ दिली.
दरम्यान,
सोमवारी येडियुरप्पा विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध
करणार आहेत.
****
राज्यात रिकामे पडलेले भूखंड तसंच पडीक शेतजमिनी
भाडेपट्ट्यावर घेऊन, त्यावर
सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सरकार विचार करत आहे. रेडी रेकनरच्या
आठ टक्के दरानं ही जमीन भाडेपट्ट्यानं घेतली जाईल, यासाठी आपले
भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यास, अनेकांनी अनुकूलता
दर्शवली असल्याचं, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. अपारंपरिक उर्जा स्रोतातून सुमारे चौदा हजार
चारशे मेगावॅट वीज निर्मितीचं राज्याचं उद्दीष्ट आहे. यासाठी
रिकाम्या भूखंडांसह जल प्रकल्पांवर तरंगते सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र उभारण्याचा सरकारचा
प्रयत्न आहे. सध्या राज्याची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे
दीड हजार मेगावॅट एवढी असून, त्यापैकी फक्त सातशे ते आठशे मेगावॅट
सौर वीज निर्मिती होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना
बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा
प्रयत्न असून, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाबरोबर जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत, तसंच बहुजन वंचित
आघाडीलाही चर्चेचं पत्र देण्यात आलं असल्याचं, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. कॉँग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेला सामावून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि तसा प्रयत्नही सुरू
नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं.
****
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या
पाच सामाजिक कार्यकर्त्यांपैकी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या याचिकेवरचा
निकाल मुंबई उच्च न्यायालयानं काल राखून ठेवला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याविरुद्ध दाखल
केलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा, अशी याचिका नवलखा यांनी
केली आहे. या संदर्भात दाखल काही पुरावे, नवलखा यांचं निर्दोषत्व दाखवत असले, तरीही इतर अनेक दस्तावेजांची
तपासणी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं.
****
मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असलेल्या जिल्ह्यांचा
एकात्मिक, केंद्रीभूत आणि
लक्ष्य आधारित पध्दतीनं विकास करण्याचं धोरण केंद्र सरकारनं हाती घेतलं आहे.
त्यानुसार देशात ११५ जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातल्या
उस्मानाबाद, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली
या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या
नाट्य गृहांच्या दुरुस्ती तसंच देखभालीसाठी विश्वस्त संस्थेची स्थापना करावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली
आहे. राज्यातले सिने कलावंत, नाट्य आणि लोककलावंत
यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात काल मुंबईत बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी ‘मन की बात’ या
आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून जनतेशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शन
वरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. मोदी यांच्या
पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारीत केलं जात आहे.
****
कारगिल विजय दिवसाचा विसावा वर्धापन दिन काल सर्वत्र
साजरा करण्यात आला. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल
युद्धातल्या शहीदांना पुष्पाजंली वाहिली. मुंबईत आयोजित कार्यक्रमात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
जालना, बीड, भंडारा, अहमदनगर,
नाशिक, उस्मानाबाद यासह सर्वच ठिकाणी कारगिल विजय
दिवस साजरा करण्यात आला. परभणी इथं जिल्ह्यातल्या
हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, हुतात्मा सैनिक गणेश चित्रेवार
यांच्या वीर पत्नी अर्चना चित्रेवार यांना शासनाकडून ५ एकर शेतीची कागदपत्रं जिल्हाधिकारी
पी. शिवशंकर यांच्या हस्ते यावेळी प्रदान
करण्यात आली. उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ मुंडे
यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केलं. औरंगाबाद,
जालनासह राज्यातल्या सर्व जिल्ह्यात यादिनानिमित्त
'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्था
मतदार संघातून शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख
अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं शिवसेनेच्या
उच्चस्तरीय सूत्रांनं सांगितलं. आज याबाबतची अधिकृत घोषणा केली
जाणार आहे.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या द्विवार्षिक
निवडणुकीसाठी मुंबईत मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात
आला असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा कक्ष
सुरू राहणार आहे.
****
गैरव्यवहार आणि पदाचा गैरवापर करून
अनेक निर्णय घेतल्याच्या आरोपांवरून बीड जिल्ह्यातल्या
पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांना निलंबित
करण्यात आलं आहे. चित्रक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीडच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता.
चित्रक यांनी तालुक्यातल्या पिंपळवाडी,
बानेवाडी, नाळवंडी याठिकाणी झालेल्या वाळू उत्खननाचा
महसूल भरून घेतला नाही, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अवैधरित्या
वसुली केली आणि पदाचा गैरवापर करून अनेक
निर्णय घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वीही चित्रक यांना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं कार्यरत असतांना निलंबित करण्यात
आलं होतं.
****
जालना जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे
ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. शंकरराव राख यांच काल रात्री हृदयविकाराच्या
झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नंतर जालनाच्या रामतीर्थ
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या चाटगाव इथं तल्लेतुलाई सौर उर्जा प्रकल्पात
काल अचानक स्फोट होऊन एका तरूण अभियंत्याचा मृत्यु झाला तर दोन
कर्मचारी गंभीररित्या भाजले. प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात
दुरूस्तीचं काम सुरू असतांना अचानक हा स्फोट झाला. काल पहाटे ही घटना घडली. जयराज जया बालन असं या अभियंत्याचं
नाव आहे.
****
जनावरांच्या छावणीला
नाही तर दावणीला चारा द्यावा यासह अन्य मागण्यासाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूर शहारात बार्शी रस्त्यावर मुरुड जवळील करकट्टा पाटीवर रस्ता रोखो आंदोलन केलं. दुबार पेरणीसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये
मदत द्यावी, खरीप पिक विमा १०० टक्के लागू
करावा, संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि वीज बील माफ करावं या अन्य मागण्याही संघटनेनं केल्या आहेत.
या आंदोलनामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प
झाली होती.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर
शहरात जनसंपर्क अभियान मोहीम सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या
काल झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत
ही बैठक झाली.
****
सोलापूर महानगरपालिकेनं कर भरणा करण्यासाठी सुरू केलेल्या
ऑनलाईन पोर्टलच उदघाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं.
यंदा मिळकत कराच्या बिलावर क्यूआर कोडचीही सुविधा असल्यानं ॲप्सच्या मदतीनं कर भरणं सुलभ झालं आहे.
****
जपान खुल्या बॅटमिंटन स्पर्धेतलं भारताची बॅटमिंटनपटू
पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीत बी साईप्रणीत मात्र उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने
सिंधूचा २१-१८, २१-१५ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. तर साईप्रणीतने
इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोचा २१-१२, २१- १५ असा पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment