Tuesday, 30 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०  जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत सादर झालं. मुस्लिम पुरुषानं, पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला विरोधी पक्षांचा विरोध आहे. हे विधेयक संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीसह बहुतांश विरोधी सदस्यांनी केली. शिवसेना, रिपब्लीकन पक्षासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजुने मतं मांडली. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, सध्या या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत.
****
पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याकरता, नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं तत्त्वत: मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प राबवण्यासाठी सर्वेक्षण करण्यासही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येत असलेल्या योजना, विशेष कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण - महाज्योती संस्थेची स्थापना करण्यासही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सरपंचांच्या मानधनात वाढ, मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता, ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या परिरक्षा धोरणाला मान्यता, सुपर 30 या हिंदी चित्रपटास वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत करमुक्त करण्यासह इतर अनेक निर्णयांना राज्यमंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
गुन्हे सिद्धीचं प्रमाण वाढते आहे, पण किरकोळ गुन्ह्यातला मुद्देमाल परत करण्याची कार्यपद्धती निर्माण करणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत राज्य पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट अशीच राहीली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. पोलिसांची प्रतिमा देशभरात अधिक उंचावण्यासाठी, पोलीस विभागाच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभं असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
काँग्रेसच्या एका तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी आज आपल्या आमदारीचे राजीनामे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केले. या चौघांमध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड, ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि मुंबइतल्या वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.
****
विधानरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे. नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी दोन तास चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरु आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही भागात कापूस तसंच सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, लातूर जिल्हयात पावसाची स्थिती चिंताजनक असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी २०१५-१६ मध्ये राबवण्यात आलेल्या टंचाईच्या उपाय योजनांची माहिती ठेवावी आणि त्याबाबतचा कृती आराखडा प्रत्येक शासकीय यंत्रणांनी तयार ठेवावा, असं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितलं आहे.
****

No comments: