आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
कारगिल विजय
दिवस आज साजरा होत आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. हा दिवस आपल्या सैनिकांचं साहस, आणि देशाप्रती
समर्पण यांचं स्मरण करून देतो असं मोदी यांनी एका ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ
कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी कारगील
विजय दिना निमित्त कारगील युद्धातल्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली, कारगिल
पहाडांवरच्या सैनिकांच्या शौर्याबद्दल देश नेहमी कृतज्ञ राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं
आहे.
देशभरातली जनता
सुरक्षित राहावी, यासाठी कारगील युद्धात भारतीय जवानांनी अतूल्य धाडस आणि त्यागाचा
प्रत्यय देत, भारतीय सेनेची प्रतिष्ठा कायम राखल्याचं, सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत
यांनी म्हटलं आहे. द्रास इथं आयोजित कारगील विजय दिन समारंभात तीन ही सैन्य दलाच्या
प्रमुखांनी या युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.
****
कनार्टकात आज
भारतीय जनता पक्षाचे बी एस येडीयुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येडियुरप्पा
यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन, सरकार स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी
सहा वाजेदरम्यान हा शपथग्रहण समारंभ होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
माजी सैनिक पाल्यांना २०१८- १९ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी आणि पदवी परीक्षांमधल्या
गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. किमान ६० टक्के
गुण असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात
अर्ज सादर करावेत असं आवाहन औरंगाबादच्या जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या
विटा इथं रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या
ताब्यातून २२ लाख रूपये किमतीची रेल्वे तिकीटं, जप्त करण्यात आली असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी
ही कारवाई केली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
गंगापुर धरण पाणलोट क्षेत्रात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. धरणातला पाणीसाठा ६१ टक्यांवर पोहोचला असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment