Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** तिहेरी तलाक
प्रतिबंधक विधेयक लोकसभेत तर माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
** राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांचा शिवसेनेत प्रवेश
** कोल्हापूरचे
आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे
** प्रशासकीय
कामात कुठल्याच संघटनेचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही - कुलगुरु डॉ. प्रमोद येवले
आणि
** राज्य साक्षरता
परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांचं दीर्घ आजारानं
निधन
****
मुस्लिम महिला
विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक काल लोकसभेत संमत झालं. विधेयकाच्या
बाजूने ३०३ तर विरोधात ७८ मतं पडली, हे विधेयक
लोकसभेत मांडलं जाण्याची ही तिसरी वेळ होती. या विधेयकावर मतदानावेळी काँग्रेस, द्रमुकसह
अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. मुस्लिम पुरुषानं पत्नीला दिलेला
तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध मानून संबंधित पुरुषाला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची
तरतूद या विधेयकात आहे.
****
माहिती अधिकार
कायदा सुधारणा विधेयक, काल राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत झालं. लोकसभेनं संमत केलेलं
हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी येताच, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे विधेयक
संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर सदनानं आवाजी मतदानानं
विधेयक मंजूर केलं.
****
संसदेच्या चालू
पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ सात ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. संसदीय कामकाजमंत्री
प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज
२६ तारखेला या अधिवेशनाचा समारोप होणार होता.
****
ज्या जिल्ह्यांमध्ये
बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायदा - पॉक्सोअंतर्गत शंभरहून अधिक प्रकरणं दाखल आहेत,
अशा जिल्ह्यांमध्ये ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी साठ दिवसात न्यायालयं स्थापन करुन
विशेष वकिलांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले
आहेत. या न्यायालयांमध्ये प्रशिक्षित आणि अनुभवी वकील नियुक्त करावेत असं मुख्य न्यायाधीश
रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. आपल्यासोबत राज्यभरातून
अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचं, अहीर यांनी यावेळी सांगितलं. अहीर
यांच्या शिवसेना प्रवेशानं फक्त शिवसेनेची नव्हे तर मराठी माणसाची ताकद वाढल्याचा विश्वास,
पक्षप्रमुख ठाकरे यांनी व्यक्त केला.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेशाची शक्यता फेटाळून
लावली आहे. अहीर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्याही शिवसेनेत
परतण्याच्या चर्चा सुरू होत्या, या चर्चा निराधार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं
आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या
कागलचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तसंच जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ
यांच्या कागल इथल्या निवासस्थानी तसंच साखर कारखान्यावर काल आयकर विभागाच्या पथकानं
छापे घातले. मुश्रीफ यांचे पुत्र तसंच निकटच्या नातलगांच्या पुणे आणि इतर शहरातल्या
घरांवरही छापे घालण्यात आले. सांगली, सातारा, सोलापूरसह ठाणे जिल्ह्यातून आलेल्या आयकर
विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नोव्हो लिप टेस्क
स्टिल या कंपनीला औरंगाबादमध्ये प्रकल्प उभारण्यास सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं
आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, या कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी
काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. वीज वहनासाठी लागणारं
विशेष दर्जाचं पोलाद निर्माण करणारी ही कंपनी, औरंगाबाद इथं दिल्ली मुंबई औद्योगिक
मार्गिका डीएमआयसीमध्ये प्रकल्प उभारणार आहे
****
प्रशासकीय कामात
कुठल्याच संघटनेचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही असं औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केलं आहे. कुलगुरु म्हणून
पदभार स्विकारल्यानंतर काल प्रथमच त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. येत्या दोन महिन्यात
विद्यापीठातली सर्वच प्रशासकीय पदं भरणार असल्याचं सांगून तासिका तत्वावरील प्राद्यापकांच्या
नेमणुकीसाठी येत्या दोन दिवसात जाहिरात देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठातले
अधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण
करण्याची गरज कुलगुरुंनी व्यक्त केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
वसमत तालुक्यातल्या गिरगाव इथला तलाठी संजय संभाराव धाडवे याला दोन हजार रुपये लाच
घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडलं. सातबाऱ्यावरचा बँक कर्जाचा
बोजा कमी करण्यासाठी त्यानं लाच मागितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड, हिंगोली
आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस झाला, या पावसामुळे काही अंशी पिकांना
जीवदान मिळालं आहे, तिन्ही जिल्ह्यात आणखी मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.
वाशिम जिल्ह्यात
काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या
वाशिम, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा शहरासह ग्रामीण भागात पावसाचं पुनरागमन
झाल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलं.
****
राज्य साक्षरता
परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांचं काल लातूरच
इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. ग्रंथालय चळवळीत मोलाचं कार्य केलेल्या
झंवर यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक, औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मराठवाडा
विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती. जिल्हा ग्रंथालय संघाच्या
अध्यक्ष पदावर ते कार्यरत होते. राज्य शासनाच्या ग्रंथ गौरव पुरस्कारानं त्यांचा सन्मान
करण्यात आला होता.
त्यांच्या पार्थिवावर
काल औसा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
राज्यातल्या
बारा जिल्ह्यांमध्ये जंगलांचं प्रमाण तीस टक्के असल्यामुळे यंदाही पिण्याच्या पाण्यासाठी तिथं टँकरची आवश्यकता भासली
नाही, अशी माहिती मराठवाडा विभागाचे अप्पर
विभागीय आयुक्त शिवानंद टांकसाळ यांनी दिली आहे. ते काल बीड इथं बोलत होते. यासाठी
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जंगल क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मत त्यांनी
व्यक्त केलं.
****
मालमत्ताधारकांनी
आज सायंकाळपर्यंत करांची थकबाकी भरली नाही तर, जप्ती मोहीम राबवण्याचा इशारा लातूर
महानगरपालिकेचे आयुक्त एम.डी.सिंह यांनी दिला आहे. थकित कर भरण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. थकित पाणी पुरवठा कर भरले
नाही तर त्वरित नळ जोडणी तोडण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मालमत्ता कराची
१०६ कोटी रुपये थकबाकी आहे, त्यापैकी ४० कोटी रुपये २५ ऑगस्टपर्यंत वसुल करण्याचं नियोजनही यावेळी करण्यात
आलं.
****
कारगिल विजय
दिनानिमित्त राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमधल्या ३९७ सिनेमागृहांमध्ये आज सकाळी १० वाजता
ऊरी - द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत दाखवला जाणार असल्याची माहिती माजी सैनिक
कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट
संघटना यांनी देशाप्रती असलेलं कार्य मानून यास सहमती दिल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यानं, पिकाची वाढ खुंटली
आहे. जिल्ह्यात पाच लाख ६५ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची सुमारे ९६ टक्के पेरणी
पूर्ण झाली आहे, त्यापैकी सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
झाला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून गाव पातळीवर मार्गदर्शन केलं जात
आहे. असं जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या
सेलू तालुक्यात चिकलठाणा तसंच वालूर महसूल मंडळात प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे त्वरीत
पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी काल शेतकऱ्यांनी
रस्ता रोखो आंदोलन केलं. उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी
आंदोलकांशी चर्चा करून, मागण्यांचं निवेदन स्वीकारलं, यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात
आलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक
विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा काल जालना इथं अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. यावेळी
माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, डॉ. आ. ह. साळुंखे साहित्य- विचार विश्व प्रसार समितीचे
समन्वयक प्रा. अर्जुन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतातल्या असंख्य
जाती, पोटजातींच्या पंरपरांमध्ये विविधता हे भारताचं वैभव असल्याचं साळूखे यांनी यावेळी
बोलतांना सांगितलं.
****
पालघर जिल्ह्यात
डहाणू आणि तलासरी भागातल्या नागझरी वसावल पाडा परिसरात काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात
बळी पडलेल्या रिश्या दामा मेघवाले यांच्या घराची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट
देऊन पाहणी केली. यावेळी मेघवाले यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश
देण्यात आला.
****
No comments:
Post a Comment