Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं आणि पुढाकारानं स्थापन
झालेल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि निवृत्त
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची
वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी नाशिकमध्ये पार पडली. यावेळी चपळगावकर यांनी मावळते
अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. विविध भाषांमधल्या
दर्जेदार साहित्याचं आदान प्रदान वाढवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं अनुवादाचा विभाग
कार्यान्वित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबादसह जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण
असून, तुरळक पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांमध्ये
२ पूर्णांक ८ मिलिमिटर, तर जालना जिल्ह्यात ८ पूर्णांक ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली
आहे.
****
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागांत
दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे.
गंगापूर धरणात पाणीसाठा ७४ पूर्णांक ३५ टक्के झाला आहे, तर दारणा धरण ८७ टक्के भरले
असून, त्यातून आज सकाळपासून १६ हजार ५९८ आणि शंभर टक्के भरलेल्या भावली धरणातून १ हजार
२१८ क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात
पाऊस होत असल्यामुळं मुळा नदीला पूर आला आहे. नदीपात्राच्या आजूबाजूच्या गावांना पाटबंधारे
विभागानं दक्षतेचा इशारा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यातही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार
पावसामुळे जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटजवळ जवळपास ५०० मीटरचा रस्ता खचला आहे. पोलिसांनी
बॅरिकेड्स लावून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
****
कामिका एकादशी निमित्त आज पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी
झाली आहे. आषाढी एकादशीनंतरची ही पहिलीच एकादशी असल्यानं विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी
वारकरी मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं वृत्त आहे.
****
त्याचबरोबर, आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणारे विदर्भ आणि
मराठवाड्यातले लाखो वारकरी, परतवारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी, संत नामदेव
महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
आपली वारी
पूर्ण करण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातील लाखो वारकरी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी
सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पोलिसांचा चोख बंदोबस्त, संस्थान आणि मंदीर
समितीकडून ठिकठिकाणी फराळाच्या सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सकाळी चार
वाजल्यापासूनच लागलेल्या भाविकांच्या रांगा दिवसभरही कायम होत्या.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडलाचे उप
अधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी यांनी लिहिलेल्या शहर-ए-औरंगाबाद या पुस्तकाचं प्रकाशन
आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि राज्य
पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते झालं. ऐतिहासिक सोनेरी
महालाच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, इतिहासतज्ज्ञ
डॉक्टर दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, डॉक्टर बिना सेंगर आणि अमेझिंग औरंगाबाद समूहाचे
सदस्य उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment