Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी काल लोकसभेत मुस्लिम महिला
विवाह संरक्षण विधेयकावरच्या चर्चेत, तालिका अध्यक्ष रमादेवी यांना उद्देशून केलेल्या
आक्षेपार्ह विधानाबाबत आज लोकसभेत शून्य काळात अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, या प्रकरणी आझम खान यांना निलंबित करण्याची मागणी
केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी
केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सर्व सदनानं
एकत्रित उभं राहण्याची गरज व्यक्त करत, महिलांच्या सन्मानासंदर्भात कडक धोरणाचा अवलंब
करावा, असं नमूद केलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी, पक्षभेद दूर सारून सर्व
महिला खासदारांनी याविरुद्ध खंबीर भूमिका घेण्याचं आवाहन केलं. तृणमूलच्या खासदार नुसरत
जहां, द्रमुकच्या कनमोळी, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी सदनातल्या सदस्याकडून अशा
प्रकारचं असभ्य वर्तन आणि विधान अपेक्षित नसल्याचं सांगितलं.
****
पाकिस्तान भारतासोबत कोणत्या प्रकारे युद्ध करू शकत नाही, त्यामुळे
ते छुपे हल्ले करत असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी म्हटलं आहे. लोकसभेत कारगिल
विजय दिवसाच्या अनुषंगानं शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्या नंतर ते लोकसभेत बोलत
होते. लोकसभा सदस्यांनी कारगिल शहिदांना मैान धारण करत अभिवादन केलं.
****
भारतीय रेल्वेला जगातली पहिली हरित रेल्वे बनवण्याचा सरकारचा प्रयत्न
असल्याचं, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नकाळात
एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
****
राज्यसभेच्या नवनियुक्त सदस्यांना सभापती एम व्यंकया नायडू यांनी
आज पदाची शपथ दिली, पट्टाली मक्कल काची पक्षाचे
अंबुमणी रामदास यांच्यासह पाच सदस्यांचा या नव्या सदस्यांमध्ये समावेश आहे. हे सदस्य
तामिळनाडू इथून निवडून आले आहेत.
****
दिल्ली पोलिसांनी नवी मुंबईत एका कंटेनर मधून १३० किलो अंमली पदार्थ
जप्त केला आहे. या प्रकरणी एका अफगाणी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. अफगाणिस्तान
वरून इराणमार्गे सागरी मार्गानं मुंबईमधे दाखल झालेला, अंमली पदार्थाचा हा साठा, बियाणांच्या
पिशव्यांमधून आणला जात होता, असं पोलिस उपायुक्त मनिषी चंद्रा यांनी म्हटल्याचं पीटीआयचं
वृत्त आहे.
****
इराणच्या ताब्यातल्या एम टि रिहाय या जहाजावरच्या ३० पैकी ९ भारतीयांची
इराणनं सुटका केली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्र नियमांचं उलंघन केल्या कारणांनी इराणनं
वेगवेगळ्या कारवाईत जहाजांना ताब्यात घेत, त्यावरच्या भारतीय नागरिकांनाही ताब्यात
घेतलं होतं, त्यापैकी ९ जणांची सुटका केली असून आणखी २१ भारतीय नागरिक इराणच्या ताब्यात आहेत. इराणसोबत
यासंदर्भात बोलणी सुरू असुन उर्वरित भारतीयांची लवकरात लवकर सुटका होईल असं परराष्ट्र
राज्यमंत्री मुरलीधरन यांनी म्हटलं आहे.
****
कारगिल विजय दिवसाच्या अनुषंगानं आज मुंबईत हिंदी आणि मराठी चित्रपट-दूरचित्रवाणी
क्षेत्रातले कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडनवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कूपरेज मैदानावर आज संध्याकाळी ६ वाजता हा
सामना होणार आहे.
****
अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती
शहरात जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदार संघासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या, विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या जात
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली इथं एका दूध संकलन केंद्रावर छापा टाकून सुमारे चारशे
लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं. या संकलन केंद्रातून दूध भेसळीचं साहित्यही जप्त
करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी या महिन्याच्या २८ तारखेला ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून जनतेशी
संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शन वरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला
जाईल. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा
भाग आहे.
****
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष आणि कार्यपद्धती
सुधारण्यासाठी तसेच या पुरस्कारांमध्ये सर्व खेळांचा समावेश कसा करता येईल याचा अभ्यास
करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी
ही माहिती दिली. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीला
अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment