Thursday, 25 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक विधेकय आज लोकसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळातही हे विधेयक लोकसभेनं संमत केलं होतं, मात्र राज्यसभेत ते संमत होऊ शकलं नव्हतं. या विधेयकानुसार तिहेरी तलाक हा गुन्हा ठरणार असून, त्यासाठी तुरुंगवासाची तरतूद आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा या विधेयकाला विरोध असून, हे विधेयक संसदीय समितीकडे तपासणीसाठी पाठवावं, अशी मागणी केली जात आहे.
****

 बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा विधेयक २०१९-पाक्सो काल राज्यसभेत पारित करण्यात आलं. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठीच्या शिक्षेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अशा गुन्हेगारांना आता मृत्यूदंडाची शिक्षा देखील दिली जाऊ शकते. १६ वर्षाखालील मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्याला वीस वर्षांपर्यंतची शिक्षा तसंच  मुलांचे अश्लील चित्रफिती बनवणाऱ्यांना पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे
****

 मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे नांदेड -पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि नांदेड - पनवेल - नांदेड विषेश गाडी, २७ जुलै ते नऊ ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेल दरम्यान  रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****

 राज्य साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष विधीज्ञ त्र्यंबकदास झंवर यांचं आज पहाटे लातूइथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी एक वाजता औसा इथल्या त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 पालघर जिल्ह्यातील तलाहरी, डहाणू, बोर्डी या भागाला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. या धक्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ पूर्णांक तकी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना ज्ञानसंपन्न बनवा असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलं आहे. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
*****
***

No comments: