Tuesday, 30 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. हे विधेयक गेल्या आठवड्यात लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर झालं. मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे गेल्या तीनही वेळा हे विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकलं नाही. मुस्लिम पुरुषाने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला विरोधकांचा विरोध आहे.
****

         राज्यात कुपोषण निमूर्लन तसचं माता बाल संगोपनासंदर्भात राज्य सरकार राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काल मुंबई इथं इराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना याबाबत माहिती दिली.
****

 खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीत दोन दिवसांनी वाढ करण्यात आली असून, आता उद्या ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचा काल अखेरचा दिवस होता, पण तांत्रिक अडचणी विचारात घेता ही मुदत वाढ देण्यात आली आहे.
****

         नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण ८० टक्के भरलं आहे. धरणातून साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे जायकवाडी धरणातल्या पाणी पातळीत तीन टक्क्यानं वाढ झाली आहे, मात्र धरणाचा पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं येळगाव धरण १०० टक्के भरलं आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे, या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. जिल्ह्यातल्या लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा मेहकर, चिखली आणि मोताळा या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे.
****

 मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात काल हलका पाऊस झाला.
*****
***

No comments: