Thursday, 25 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मुस्लिम महिला विवाह संरक्षण विधेयक अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर लोकसभेत आज चर्चा सुरू आहे, हे विधेयक लोकसभेत मांडलं जाण्याची ही तिसरी वेळ आहे. अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, विधेयकाच्या बाजूने तसंच विरोधात मतं मांडली. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी, या विधेयकातल्या दंडात्मक कारवाईला विरोध दर्शवला. मुस्लिम पुरुषानं पत्नीला दिलेला तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध मानून संबंधित पुरुषाला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे. विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत.
****
राज्यसभेचं कामकाज मात्र, माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयकावरून आज वारंवार बाधित झालं. लोकसभेनं संमत केलेलं हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी येताच, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. सदनात सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे.
****
नोव्हो लिप टेस्क स्टिल या कंपनीला औरंगाबादमध्ये प्रकल्प उभारण्यास सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, या कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. वीज वहनासाठी लागणारं विशेष दर्जाचं पोलाद निर्माण करणारी ही कंपनी, औरंगाबाद इथं दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका डीएमआयसी मध्ये प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची तर तीन वर्षांनी सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील आणि अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मुलाखतीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जामखेड कर्जत मतदारसंघासाठी मुलाखत दिली. अकोलेचे आमदार वैभव पिचड, अहमदनगर शहरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंद्यांचे राहुल जगताप हे तीन आमदार या मुलाखतीला हजर राहिले नाहीत, यापैकी वैभव पिचड हे भाजपच्या संपर्कात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा इथंही आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्याच्या मुलाखती घेतल्या, यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर आज सकाळी शिवसेनेत दाखल झाले, त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्याही शिवसेनेत परतण्याच्या चर्चा सुरू होत्या, या चर्चा निराधार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नार पार प्रकल्पासाठी आपण आपल्या कार्यकाळात ७० कोटी रूपयांची तरतूद केली होती, या बोगद्याच्या कामासाठी आपणच पाठपुरावा करून हे काम करून घेतलं आहे, असं भुजबळ यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या गिरगाव इथला तलाठी संजय संभाराव धाडवे याला  दोन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडलं. सातबाऱ्यावरचा बँक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यानं लाच मागितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यानं, पिकाची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात पाच लाख ६५ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची सुमारे ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे, त्यापैकी सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून गाव पातळीवर मार्गदर्शन केलं जात आहे. कृषी विभागानं दिलेल्या सल्ल्यानुसारचं पिकावर कीटकनाशकांची फवारणी करावी, अशा सूचना जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात चिकलठाणा तसंच वालूर महसूल मंडळात प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, मागण्यांचं निवेदन स्वीकारलं, यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. 
****

No comments: