Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै
२०१९ दुपारी १.०० वा.
****
डिजिटल इंडिया मुळं जनतेचं
सशक्तिकरण होत असुन भ्रष्टाचारावर योग्य प्रतिबंध तसचं गरिब जनतेपर्यंत सुविधा पोहचवण्यास
मदत होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. चार
वर्षाआधी आजच्या दिवशी डिजिटल इंडिया या योजनाची सुरवात झाली होती. डिजिटल इंडिया हे एक जन-आंदोलन असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
****
वस्तु आणि सेवा कर म्हणजेच
GST लागु होण्याच्या दोन वर्षानंतर विस राज्यांच्यां एकूण महसुल उत्पन्नात चौदा टक्के
वाढ झाली असल्याचं, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मागिल दोन वर्षात
वस्तु आणि सेवा कर प्रणालीमुळं ग्राहकांवरचा करभार कमी झाला असुन कर वसूलीत सुधारणा
झाली असल्याचं, वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या प्रत्येक बैठकीत दिसुन आलं असल्याचंही
जेटली म्हणाले.
****
वातावरण बदलाच्या संकटाचं
भीषण वास्तव आपल्या समोर असून, ते निवारण्याच्या कार्यात प्रत्येकानं आपली भूमिका जबाबदारीने
पार पाडावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात ३३ कोटी
वृक्ष लागवड मोहिमेला आज चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं आनंदवनातून प्रारंभ झाला, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस
कोटी वृक्षारोपण होईल, असा विश्वास, मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यभरात
येत्या तीस तारखेपर्यंत सर्वत्र ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
पुण्यात गृहनिर्माण संस्थेची
संरक्षक भिंत पडून पंधरा जणांच्या मृत्यूचा मुद्दा आज विधानसभेत शून्य प्रहरात अनेक
सदस्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, बाहेरच्या राज्यातून
येणाऱ्या कामागारांची नोंदणी करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. संबंधित विकासकाच्या
हलगर्जीपणाकडे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा
आरोप, वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे विकासकासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, आणि दोषींवर कठेार कारवाई करण्याची मागणी विरोधी
पक्षनेत्यांनी केली. या घटनेतल्या जखमींच्या मदतनिधीत वाढ करावी अशी मागणीही त्यांनी
यावेळेस केली.
****
मराठी भाषेला अभिजात
दर्जा देण्याबाबतच्या मुद्यावर विधान परिषदेत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी
निवेदन सादर केलं. यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेचा आढावा त्यांनी सदनासमोर
मांडला. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यासंदर्भात आतापर्यंतच्या कार्यवाहीबाबत त्यांनी
माहिती दिली. गणिताच्या इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातलं संख्यावाचन, या बाबतही माहिती
देताना, तावडे यांनी, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक समिती स्थापन केल्याचंही सांगितलं.
मराठी भाषेसंदर्भातली
उदासीनता दूर करण्यासाठी साहित्यिकांसह नेतेमंडळींनीही पुढाकार घ्यावा, महाबळेश्वर
जवळ भिलार इथं उभारलेल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाला सर्वांनी भेट द्यावी, असं आवाहन
तावडे यांनी केलं.
****
भंडारा जिल्ह्यातल्या
तुमसर तालुक्यात सीतासांवगी गावात विजेचा शॉक देऊन वाघाची
शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात
आली असून, त्यांच्या कडून वाघाची २२ नखं, चितळाची सात शिंगं, आणि जनावरांचं मांस जप्त
करण्यात आलं आहे. या आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे.
या स्पर्धेत गुणतालिकेत श्रीलंका सहा गुणांसह सातव्या स्थानावर तर वेस्ट इंडीज तीन
गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
दरम्यान, कालच्या सामन्यात
इंग्लंडकडून पराभव झाल्यामुळे, भारत गुणतालिकेत अकरा गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम
आहे. न्यूझीलंड अकरा गुणांसह तिसऱ्या तर इंग्लंड दहा गुणांसह चौथ्या स्थानावर कायम
आहे.
****
टेनिसमधील प्रतिष्ठित विम्बलडन स्पर्धेला आजपासून
लंडन इथं सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीत आज, नोवाक जोकोविच आणि फिलीप कोलश्राइबर
तसंच रॉजर फेडरर आणि लॉयड हॅरिस यांच्यात सामना होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment