आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
भाविकांचं श्रद्धास्थान
असलेल्या जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. जवळपास बाराशे
यात्रेकरुंचा पहिला जत्था अनंतनागचे उपायुक्त खालिद जहांगीर यांच्या उपस्थितीत पहलगाम
तळावरून आज रवाना झाला. अमरनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे
राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याहस्ते शासकीय पुजेनंतर अमरनाथ दर्शनाला प्रारंभ होईल.
ही यात्रा सुमारे शेहेचाळीस दिवस चालणार असून, येत्या १५ ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा
अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी, या यात्रेचा समारोप होईल.
****
जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड
जिल्ह्यात आज सकाळी एक बस दरीत कोसळून तेहेतीस प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२ प्रवासी
जखमी झाले. आज सकाळी हा भीषण अपघात झाला. आतापर्यंत सुमारे वीस प्रवाशांचे मृतदेह दरीतून
बाहेर काढण्यात आले असून, मदतकार्य सुरू असल्याचं, पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलं.
****
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर
लोणावला ते ठाकूरवाडी दरम्यान एका मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं, या मार्गावरची
रेल्वे वाहतुक आ सकाळपासूनच ठप्प झाली आहे. पावसामुळे हा अपघात झाल्याचं, सांगण्यात
येत आहे. या अपघातामुळे डेक्कन क्वीनसह अनेक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अंगावर
वीज पडल्यामुळे दोन जण ठार झाले, तर दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. वरवट खंडेराव
इथले शेतकरी श्रीकृष्ण ढमा, तसंच संग्रामपूरच्या जस्तगाव इथले युवराज गव्हांदे अशी
मृतांची नावं आहेत.
****
पंतप्रधानांनी मन की बात मधून केलेलं जलसंवर्धनाचं आवाहन
राज्यातली जनता निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर
इथं हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते बोलत होते. राज्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment