Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची उभारणी, केंद्र सरकारकडून मिळणार ४०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
• फास्टटॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
• संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय पुरस्कार प्रदान
• १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करण्याचे विभागीय आयुक्तांचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश
आणि
• होळी तसंच धुलिवंदन सणाचा सर्वत्र उत्साह
****
जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्हज-२०२५ च्या आयोजनासाठी मुंबईची निवड अतिशय योग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यामुळं माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरी वाढवण्याबरोबरच, ती पारंपरिक आणि आधुनिक सांस्कृतिक प्रभावांचा अखंड मिलाफ साधते, असं ते म्हणाले. वेव्हज ही एक चळवळ आहे, जी तांत्रिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनामधील माध्यमांची बदलती भूमिका अधोरेखित करते, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, गुंतवणुकीला चालना आणि जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दिल्ली इथं झालेल्या या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल पोहोच या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याविषयी सामंजस्य करार करण्यात आले. सर्जनशीलता, माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या एकीकरणामुळे जागतिक माध्यमांत परिवर्तन घडत आहे आणि हे क्षेत्र अभिसरणाच्या एका नवीन पातळीवर पोहोचत आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. मुंबई इथं १ ते ४ मे दरम्यान वेव्हज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी - आयआयसीटी मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल आणि यासाठी केंद्रसरकार ४०० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल दिल्लीत माध्ममांशी बोलत होते. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, पूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असं त्यांनी सांगितलं. याविषयीची प्राथमिक तयारी झाल्याचं ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. गडचिरोली देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्रानं सहकार्य करण्याची मागणी फडणवीस यांनी पंतप्रधानांकडं केली.
****
पथकर भरण्यासाठी फास्टटॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पुण्याचे अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली. राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टटॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा देत, या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, न्यायालयाने स्पष्ट केलं.
राज्य सरकारने आपल्या धोरणाचं समर्थन करताना फास्टटॅगमुळे पथकर नाक्यावर वाहतुकीच्या खोळंब्यात लक्षणीय घट झाल्याचं म्हटलं असून हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
****
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत योग महोत्सव २०२५ चं उद्घाटन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या १०० दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. योग बंधन हा कार्यक्रम १० देशात होणार असून, देशातल्या १० हजारांहून अधिक ठिकाणी होणाऱ्या योग संगम या कार्यक्रमाचाही यात समावेश आहे, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2022-23 अंतर्गत या वर्षातील छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय पुरस्कार काल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ लाख रुपयांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातल्या जकेकूरवाडी ग्रामपंचायतीला, नऊ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दूधड ग्रामपंचायतीला तर सात लाख रुपयांवा तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्ह्यात चौंढी शहापूर ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. सांडपाणी व्यवस्थापनासाठी नांदेड जिल्ह्यातल्या जवळगाव ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयांचा वसंतराव नाईक पुरस्कार, पाणी गुणवत्तेसाठी लातूर जिल्ह्यातल्या सिकंदरपूर ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, तर शौचालय उभारणीसाठीचा ७५ हजार रुपयांचा आबासाहेब खेडकर पुरस्कार परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीना प्रदान करण्यात आला. गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी प्रत्येक घटकाने पुढे यावं, असं आवाहन विभागीय आयुक्त गावडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी. कार्यालयाचं संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ असावं, ई-ऑफीस प्रणाली, क्षेत्रभेट, स्वच्छता, कार्यालयामधील सेवासुविधांची उपलब्धता, तक्रार निवारणातून सुकर जीवनमान तसेच नाविन्यपूपर्ण उपक्रम राबवून उत्कृष्ट काम करावं अशा सूचनाही गावडे यांनी या बैठकीत दिल्या.
****
होळीचा सण काल साजरा झाला. सायंकाळच्या सुमारास सर्वत्र पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
होलिकापूजनाच्या निमित्तानं असत्य, अधर्म आणि अहंकाराचं दहन करून, सत्य, न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडा समोर मोठ्या उत्साहात होळीचं पूजन आणि दहन करण्यात आलं. मंदिरातील होळी पूजनानंतरर शहरात घरोघरी होळीचं पूजन करण्यात आलं. हुताशनी पौर्णिमेनिमित काल देवीचा छबिना काढण्याऐवजी होळी साजरी करण्यात येऊन जोगवा मागण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ढोरेगाव केंद्रीय प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काल शालेय परिसरातील कचऱ्याची होळी पेटवली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुलांनी जलप्रतिज्ञा देखील घेतली. नैसर्गिक रंगाचा वापर करत तसंच पर्यावरण बचावचा संदेश देत धुलिवंदन साजरं करण्यात आला.
****
बीड इथे झालेल्या तीन दिवसीय नवतेजस्वनी महोत्सवात १३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एस.बी. चिंचोलकर यांनी ही माहिती दिली. या महोत्सवात जिल्ह्यातील एकूण ५२ बचतगटांनी आपल्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते.
****
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. पात्र तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेती आणि शेतकऱ्यांसाठी हिताचा नसल्याचा आरोप करत, परभणी इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी तसंच शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, परभणी इथं राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात काल शेकडो शिक्षकांनी प्रतिकात्मक अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment