Sunday, 16 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

राज्यभरात १८ जिल्ह्यांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं दोन टप्प्यात सौरऊर्जीकरण 

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडून व्यक्त 

औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप तसंच बजरंग दलाचं उद्या आंदोलन 

मुंबई इंडियन्स संघाने पटकावलं क्रिकेटच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेचं विजेतेपद   

आणि 

राज्यात उन्हाचा पारा वाढला, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा 

****

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यात लातूरसह १८ जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौरऊर्जीकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सौरऊर्जीकरणाचं काम दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातल्या अडिचशे प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम पूर्णत्वास आलं असून, दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ऊर्जेबाबत स्वावलंबी होणार असून, विजेच्या देयकांमध्ये मध्ये मोठी बचत होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची २४ तास अखंड वीज पुरवठ्याची गरजही यामुळे पूर्ण होणार असून, आरोग्य सेवा अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

****

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिली ते नववी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन पॅट चाचण्या एकाच वेळी घेण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला आहे. त्यानुसार शाळांनी आठ ते २५ एप्रिल दरम्यान या परीक्षा आणि चाचण्या घ्यायच्या आहेत. मात्र, २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याचं वेळापत्रक कोणत्याही दृष्टीने सुसंगत नसल्यानं संदर्भित आदेश रद्द करून प्रचलित पद्धतीनुसार परीक्षांचं वेळापत्रक ठरवण्याचं नियोजन, शाळा स्तरावरच असावं अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शिक्षण आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

****

विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते व्हावं, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथल्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात काल दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. शिक्षणामुळे फक्त संबंधित विद्यार्थ्यांचाच विकास घडून येत नाही, तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो, असं गडकरी यांनी नमूद केलं. 

****

 

पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची आवश्यकता असल्याचं, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशुखाद्य प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा हा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतीमधे क्रांती होत असून, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार यांनी सांगितलं. 

****

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल सिंधुदुर्ग इथून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. कुडाळ इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वापरली जाणारी भाषा दुर्देवी असल्याची टीका सपकाळ यांनी केली. 

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कवंडे इथं जंगलात पुरलेली स्फोटकं पोलिसांनी शोधून काढली. नऊ मार्चला गडचिरोली पोलिस दलाने या ठिकाणी पोलिस ठाण्याची उभारणी केली होती. पोलिस मदत केंद्रापासून जवळच ही स्फोटकं पुरण्यात आली होती. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने उद्या सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीसंदर्भात निवेदन सादर करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, राज्य राखीव दलाची तुकडी या परिसरात तैनात करण्यात आल्याचं वृत्त आहे. 

****

क्रिकेटच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा किताब मुंबई इंडियन्सनं पटकावला आहे. काल मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई संघानं दिल्ली कॅपिटल्सवर आठ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने वीस षटकांत सात बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव वीस षटकांत नऊ बाद १४१ धावांवर संपुष्टात आला. मुंबईची कर्णधार हरमनप्रित कौरला ४४ चेंडुत केलेल्या ६६ धावांच्या जोरावर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. तर, मुंबईची अष्टपैलु खेळाडू नताली सिव्हर ब्रंट हिला प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि वेस्ट इंडीज संघात होणार आहे. रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. वेस्ट इंडिजने श्रीलंका मास्टर्सचा तर इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 

****

 

विद्यार्थ्यांनी पुरेसं पाणी प्यावं, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात वॉटर बेल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तासिकेनंतर मुलांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाते. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी याबाबत अधिक माहिती दिली... 

बाईट -मुख्याध्यापक संजीव सोनार

****

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातल्या रुई, राळगा आणि वरवंटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय, नवनिर्मित तसंच चुकीची प्रभाग रचना झाल्यानं निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि २८ फेब्रुवारी २०२५ अखेर रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज श्रीक्षेत्र देहू इथं होणार आहे. यंदाचा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून, या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 

****

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाथांचा रांजण भरण्यास आज सुरुवात होत आहे. यानिमित्तानं नाथषष्ठीला औपचारिक सुरुवात होणार असून, येत्या गुरुवारी २० तारखेला नाथषष्ठीचा मुख्य सोहळा होणार आहे. 

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३५४ कोटी ३७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. काल विद्यापीठात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठकीत अर्थसंकल्पासह विविध विषय मंजूर करण्यात आले. या बैठकीस प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह ६२ सदस्य उपस्थित होते. 

****

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर- नांदेड दरम्यान पिंपळगाव फाटा इथं चारचाकी आणि ट्रकच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास भरधाव वेगातल्या स्कार्पिओवर चालकाचं नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये स्कॉर्पिओ मधले सय्यद हुशेब आणि शेख सलाम या नांदेडच्या रहीवाशांचा मृत्यू झाला. जखमींना विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****

चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत झालेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी इथले रहिवासी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

 


राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४१ पूर्णांक ४ अंश सेल्सियस तापमानाची झाली. मराठवाड्यात काल परभणी इथं सर्वाधिक ३९ पूर्णांक आठ दशांश, तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं पारा ३८ अंशांवर राहिल्याची नोंद आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. अकोला, चंद्रपूर, आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...