Thursday, 13 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      फास्टटॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

·      संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय पुरस्कार प्रदान

·      १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करण्याचे विभागीय आयुक्तांचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश

आणि

·      होळी तसंच धुलिवंदन सणाचा सर्वत्र उत्साह

****

पथकर भरण्यासाठी फास्टटॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पुण्याचे अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टटॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा देत, या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, न्यायालयाने स्पष्ट केलं.

राज्य सरकारने आपल्या धोरणाचं समर्थन करताना फास्टटॅगमुळे पथकर नाक्यावर वाहतुकीच्या खोळंब्यात लक्षणीय घट झाल्याचं म्हटलं असून हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

****

पानिपत इथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक उभारण्यासंदर्भातला शासन आदेश निर्गमित झाला आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हरियाणा राज्यातील पानिपत इथल्या कालाअंबपरिसरात लवकरच मराठा शौर्य स्मारकउभारलं जाईल, अशी माहिती पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिली. या शौर्य स्मारकासंबंधीची घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती.

****

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत योग महोत्सव २०२५ चं उद्घाटन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या १०० दिवसांत देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. योग बंधन हा कार्यक्रम १० देशात होणार असून, देशातल्या १० हजारांहून अधिक ठिकाणी होणाऱ्या योग संगम या कार्यक्रमाचाही यात समावेश आहे, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.

****

मुंबईत आयोजित वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्हज परिषद होणार आहे, या कार्यक्रमासाठी सर्वांचं स्वागत करण्यास उत्सुक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत या वर्षातील छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय पुरस्कार आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ लाख रुपयांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातल्या जकेकूरवाडी ग्रामपंचायतीला, नऊ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दूधड ग्रामपंचायतीला तर सात लाख रुपयांवा तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्ह्यात चौंढी शहापूर ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. सांडपाणी व्यवस्थापनासाठी नांदेड जिल्ह्यातल्या जवळगाव ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयांचा वसंतराव नाईक पुरस्कार, पाणी गुणवत्तेसाठी लातूर जिल्ह्यातल्या सिकंदरपूर ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, तर शौचालय उभारणीसाठीचा ७५ हजार रुपयांचा आबासाहेब खेडकर पुरस्कार परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीना प्रदान करण्यात आला. गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी प्रत्येक घटकाने पुढे यावं, असं आवाहन विभागीय आयुक्त गावडे यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज यासंदर्भातल्या आढावा बैठकीत दिले. विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी. कार्यालयाचं संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ असावं, ई-ऑफीस प्रणाली, क्षेत्रभेटी, स्वच्छता, कार्यालयामधील सेवासुविधांची उपलब्धता, तक्रार निवारणातून सुकर जीवनमान तसेच नाविन्यपूपर्ण उपक्रम राबवून उत्कृष्ट काम करावं अशा सूचनाही गावडे यांनी या बैठकीत दिल्या.

****

होळीचा सण आज साजरा होत आहे. आज सायंकाळच्या सुमारास सर्वत्र पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात येत आहे. प्रज्वलित होळीची पूजा करून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना करण्यात येते, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याचाही प्रघात आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होलिकापूजन तसंच प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हे सण साजरे करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे.

होलिकापूजनाच्या निमित्तानं असत्य, अधर्म आणि अहंकाराचं दहन करून, सत्य, न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. होलिका दहनात समाजातल्या दुष्प्रवृत्तींचं समूळ उच्चाटन होवो, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो अशी सदिच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, होळी आणि धुळवडीचा हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन प्रशासन तसंच पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या मढीच्या यात्रेला आज सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करून देणार नसल्याचा ठराव मढी ग्रामसभेने घेतला होता, न्यायालयाने तो रद्दबातल ठरवला होता, मात्र आज पुन्हा एकदा सरपंचांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावून देणार नाही असा पवित्र घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

या पार्श्वभूमीवर यात्रा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात सातकुंड इथल्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. गेल्या १० तारखेला सातकुंड इथले सहा ऊसतोड कामगार, ऊसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ठार झाले होते. मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये इतकं अनुदान वारसांच्या बँक खात्यात जमा झालं असल्याचं पत्र पालकमंत्री शिरसाट यांच्या उपस्थितीत देण्यात आलं. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेतून ही मदत देण्यात आली.

****

 

 

बीड इथे झालेल्या तीन दिवसीय नवतेजस्वनी महोत्सवात १३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एस.बी. चिंचोलकर यांनी ही माहिती दिली. या महोत्सवात जिल्ह्यातील एकूण ५२ बचतगटांनी आपल्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते.

****

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. पात्र तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केलं आहे.

****

राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेती आणि शेतकऱ्यांसाठी हिताचा नसल्याचा आरोप करत, परभणी इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी तसंच शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, परभणी इथं राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात आज शेकडो शिक्षकांनी प्रतिकात्मक अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी करण्यात आली. सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करून आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॉश स्पर्धेतून भारताचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात त्याला स्कॉटलंडच्या ग्रेग लोबनकडून हार पत्करावी लागली. सेंथिलकुमारनं पहिला सेट ८-११ नं जिंकला होता, मात्र लोबननं पुढचे दोन्ही सेट जिंकत त्याचा १-३ असा पराभव केला.

****

 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारतानं ९५ पदकांसह पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारतानं ३३ सुवर्ण, २९ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. २६ पदकांसह न्यूट्र पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्थान तिसऱ्या स्थानी आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...