Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशभरात होळीचा सण उत्साहात पारंपारिक पद्धतीने
साजरा होत आहे. आज होळी पोर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार
आहे. होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिकादहनाच्या
वेळी करण्याचा प्रघात आहे. रंगोत्सव अर्थात रंगपंचमी होळीपोर्णिमेनंतर साजरी केली जाते.
काही ठिकाणी उद्या धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करत हा उत्सव साजरा केला जाईल.
देशात वेगवेगळ्या नावाने रंगोत्सव साजरा
होतो. उत्तर प्रदेशात नंदगावात भगवान श्रीकृष्णा तसंच गोप गोपींचा वेश परिधान करुन
रंग खेळला जातो आणि गावातल्या महिला त्यांच्यावर लाठ्यांचा
मारा करतात.
मध्यप्रदेशात गेरु ने रंग खेळतात आणि एकमेकांवर
गुलालाची उधळण होते. उत्तराखंड मध्ये पारंपरिक वेशभूषा करुन मंदिरं आणि सार्वजनिक स्थळी
लोक जमतात आणि लोकगीतांचं सादरीकरण करतात, याला बैठकी होली म्हणून ओळखलं
जातं.
पंजाबच्या निहंग आनंदपूर साहिबमध्ये कसरती
दाखवून होला मोहल्ला या नावाने होळी साजरी करतात तर तामिळनाडू मध्ये श्री विष्णुंच्या
मदिरांमध्ये तीर्थनगरीचं आयोजन करण्यात येतं. मणिपूर मध्ये ढोल नगाऱ्यांच्या साक्षीनं
श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं जातं.
****
वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल
ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र
सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज
परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल. जगभरातल्या १०० हून अधिक
देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत
एक ते चार मे दरम्यान वेव्हज परिषद होणार आहे.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ चा अंतिम
निर्णय हा सर्वसंबंधितांशी विचार विनिमय करुन लवकरच जाहीर करणार असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत ते काल बोलत
होते. या समितीच्या अशासकीय सदस्यांनी पुरस्कार निवडीबाबत आपापली मतं मांडली.
****
राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात
येत आहे. जवळपास नऊ कोटी १२ लाख सातबारा ऑनलाईन
केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झालं आहे तिथे १०० टक्के ऑनलाईन फेरफार
देण्यात येत असल्याची माहिती, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
राज्यात ४२ लाख ३४ हजार फेरफार ऑनलाईन पद्धतीने दिल्याचं सांगून, यामुळे
शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने
लातूर इथल्या दयानंद सभागृहात कृषि संस्कृती महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी रमेश जाधव,
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिवसांब
लाडके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शैलेश गोजमगुंडे यावेळी उपस्थित होते. या तीन
दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६६वी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत जामखेड इथं होणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली. येत्या २६ ते ३० मार्च पर्यंत ही स्पर्धा आयोजित
केली जाणार असून,
या स्पर्धेत कोणतंही राजकारण असणार नाही, असंही
रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
****
नाशिकमध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत काल एकाच दिवशी १४२ उद्योगांचे सामंजस्य करार झाले. यातून सहा हजार ४०४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, १४ हजार ४०३ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य कराराचं वितरण नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आलं. ही गुंतवणकू केवळ औद्योगिक क्षेत्रात नाही तर शिक्षण संस्था, हास्पिटिलॅटी, आरोग्य क्षेत्र, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या उद्योजकांनी केली आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला
असून, येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.
दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेमुळे
शाळेच्या वेळा कमी करण्याची मागणी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी जिल्हा
प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या परतूर आणि सेलू
रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस ला थांबा देण्यात आला असून, त्याला
सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment