Wednesday, 12 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान, आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात होणार सहभागी 

प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांबाबत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

विधीमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ-ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची विरोधकांची टीका 

राज्य सरकारकडून जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल, सबळ पुरावे नसल्यास होणार फौजदारी कारवाई

मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची अर्जुन खोतकर यांची मागणी 

आणि

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन, हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी काल भारतीय समुदायातल्या नागरीकांच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. मोदी हे या पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा हा २१ वा पुरस्कार आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

****

प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भोंग्यांची आवाजाची मर्यादा तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाकडे सोपवत असल्याचं, त्यांनी सांगितलं. अशा प्रकरणात कठोर कारवाई करता यावी, यासाठी संबंधित नियमात सुधारणा करून देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले... 

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय यापुढे मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरूण सरदेसाई यांनी, दारूबंदीसाठीच्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी केली. यात ५० टक्के ऐवजी ७५ टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्यास, दारू दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठीच्या यासंदर्भातल्या नियमात बदल करण्याचं आश्वासनही, पवार यांनी यावेळी दिलं. 

****

राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. काल सदनात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते. या अर्थसंकल्पात जुन्या घोषणांचेच बुडबुडे असून दिशाभूल करण्यात आल्याचं दानवे यांनी नमूद केलं. ते म्हणाले... 

बाईट – अंबादास दानवे

भाजपचे प्रसाद लाड यांनी, या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची दिशा बदलेल, असं सांगत, विकास आणि वारसा याची सांगड असलेला हा अर्थसंकल्प असल्याचं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे भाई जगताप यांनी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचं आश्वासन या अर्थसंकल्पातून पाळलं नसल्याची टीका केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा अर्थसंकल्प कोणाच्याही कामाचा नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका केली.

 

विधानसभेतही काल अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हा अर्थसंकल्प राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नसून हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. 

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या चर्चेत बोलतांना, राज्यातल्या अडचणींना तोंड देत हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं. 

जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढत, कृषी, रोजगार, सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मोसंबी रस अधिकाधिक दिवस टिकावा, यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं, असं ते म्हणाले,  

बाईट – अर्जुन खोतकर

****

राज्य सरकारने जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधल्या तरतूदीनुसार तसंच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २००० नुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, तसंच त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील, अशा अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रलंबित ४८ प्रकल्पांतल्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी केली. 

****

केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी समाजमाध्यमांवरून दिली. छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगांव या ९३ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही, दोन कोटी ३२ लाख रुपये मंजूर झाले असून, याबाबतचं पत्र रेल्वे विभागानं जारी केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, अहिल्यानगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून या मार्गाचं काम जलदगतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. 

****

पुण्यात स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, २२ सुरक्षा रक्षक बदलण्यात आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. एसटी प्रवाशांच्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात हयगय झाल्यास, कठोर कारवाईचे संकेत, सरनाईक यांनी दिले. 

****

धाराशिव जिल्ह्यात शेतीसोबतच पर्यटन क्षेत्रात प्राधान्यानं काम करणार असून, जलयुक्त शिवार, फळबाग लागवड, दळणवळण या क्षेत्राचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी केलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या दीडशे पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असून यात महिला बचत गटांना सहभागी करणार असल्याचं पुजार यांनी सांगितलं. 

****

श्रीशैल्य उटगे यांनी काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिल्याचं उटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

****

होळीचा सण उद्या साजरा होणार आहे. होळी तसंच धुलिवंदन साजरा करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे. 

दरम्यान, या सणांच्या काळात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्हा शांतता समिती आणि विभागप्रमुखांच्या काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

****

लातूर स्त्री रोग संघटनेतर्फे 'सुरक्षित मातृत्व' या विषयावर काल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भावस्थेतील काळजी, आहार, आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन केलं. 

****

धाराशिव जिल्ह्यात तसंच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात वाघाचा वावर आढळून आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ स्थलांतरित झाला असण्याची शक्यता असून, भूम, वाशी, कळंब, परंडा, येडशी-रामलिंग घाट आणि बार्शी वन परिक्षेत्रात या वाघाचा वावर दिसून येत आहे.

****

नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस १४ मार्च रोजी आणि परभणी ते नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या आणि १५ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे ही माहिती देण्यात आली.

****


No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...