Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी
महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची
प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या
भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदीराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही
स्थळं आहेत, म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी,
या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
या मंदीराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची
घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी, या मंदीर्च्या विकासासाठी
शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.
****
तिथीनुसार शिवजयंती आज राज्यात ठीकठिकाणी
साजरी करण्यात येत आहे. या निमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून
अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४५ फुटी पुतळ्याचं अनावरण करत त्यांना अभिवादन केलं.
नागपूर शहरात महाल परीसरात असलेल्या छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं
पंचामृतानं अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी
महाराजांचा जयघोष करण्यात आला.
****
विधानसभेत आज अर्थमंत्री अजित पवार यांनी
अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या आरोपांचं
त्यांनी खंडन केलं. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प
असल्याचं ते म्हणाले. मागच्या अडीच वर्षात राज्य झपाट्यानं पुढे गेलं असल्याचं पवार
यांनी नमूद केलं.
****
भारतीय कापूस महामंडळ - सीसीआय मार्फत सुरू
असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पणन
मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सीसीआय ने
लांब धाग्याच्या कापसाला सात हजार ५२१ हमीभाव दिला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी
दिली.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातली १५३ रिक्त
पदं येत्या महिन्याभरात भरली जातील अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. या
संदर्भात भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
****
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुघल शासक औरंगजेब याच्याशी तुलना केल्याचा
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत निषेध केला. हा महाराष्ट्राचा अपमान असून
सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात
येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं.
****
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा
आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज संजय खोडके यांना उमेदवारी
जाहीर केली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने
संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली
आहे, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी हे आज अर्ज भरणार आहेत.
विधान परिषदेतले पाच सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी
२७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याच्या
आत्महत्येला सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं
केली. या शेतकऱ्याने पाण्यासाठी जीव दिला, त्यामुळे शेतकऱ्यांना
पुरस्कार नको पाणी द्या अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि इतर आमदार उपस्थित होते.
****
नाविन्यपूर्ण 5G-संचालित तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने
5G इनोव्हेशन हॅकेथॉन २०२५ ची घोषणा केली आहे. या उपक्रमात प्रसारण,
आरोग्य, कृषी, औद्योगिक क्षेत्रांतील
विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांच्या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या नवेपक्रमांना प्रोत्साहीत केले जाईल.
****
राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय
योजनांचा सांगली जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून
जिल्ह्यातल्या जवळपास २२० गावात कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी केली
जाणार आहे. या चित्ररथावर विविध शासकीय योजनांचे फलक, तसंच ध्वनीफितीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून त्यांना माहिती दिली
जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment