Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा २०२५ या वर्षाचा डीजीटल ट्रान्स्फॉर्मेशन ॲवॉर्ड जाहीर झाला आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअरसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या सॉफ्टवेअरमुळे रिझर्व्ह बँकेतल्या अनेक प्रक्रिया कागद विरहित झाल्या आहेत.
****
आज जागतिक ग्राहक अधिकार दिन आहे. ग्राहकांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षा अबाधित ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्व ग्राहकांच्या मूळ अधिकारांना चालना देणं तसंच या अधिकारांचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल ही या वर्षीच्या ग्राहक अधिकार दिनाची संकल्पना आहे.
****
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होत आहे. यंदा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गावात स्वच्छतेची कामं करण्यात आली असून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
****
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जवान सुनील गुजर यांना सेवा बजावत असताना, मणिपूर इथं झालेल्या भूस्खलनात वीरमरण आलं आहे. सुनील गुजर, पुण्याच्या बॉम्बे इंजीनियरिंग गटात प्रशिक्षण पूर्ण करून, २०१९ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचं पार्थिव शरीर आज रात्री पुण्यात आणण्यात येणार आहे, तर उद्या त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरच्या उल्हास नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर अंघोळीसाठी हे चौघे उल्हास नदी पात्रात आले होते.
काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास काही तरुण रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात आले होते. त्यातील एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाचवताना तीन मित्र देखील पाण्यात बुडाले. या चौघांचा बदलापूर अग्निशामक दलाच्याकडून कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचे मृतदेहर बाहेर काढले आहेत.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटूंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन तहसिलदार संजय वरकड यांनी केलं आहे.
ई-केवायसीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात समक्ष उपस्थित राहून ई-पॉश मशिनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, किंवा राज्य सरकारनं एनआयसीच्या सहकार्यानं लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या मेरा ई-केवायसी ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये ईकेवायसी पूर्ण करावं असं सांगितलं आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
होळी लहान करा गोवऱ्या दान करा...या कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहर परिसरातील तरुण मंडळ आणि सामाजिक संस्था यांच्या वतीनं १ लाख ७८ हजार ६०५ गोवऱ्या दान करण्यात आल्या.
गेल्या दोन दिवसांत होळी पोर्णिमा सणानिमित्त तरूण मंडळं, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था तसंच दानशूर व्यक्तीकडून १ लाख ७८ हजार ६०५ गोवऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभुमीसाठी दान देण्यात आल्या.
****
राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा ३९ ते ४० अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment