Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०८ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
अल निनोच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान
कार्यालयाने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारतीय हवामान विभागाने देशातली मान्सूनची
सद्यस्थिती आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मान्सूनचं
आगमन सुमारे १० दिवस उशिरा झालं, मात्र सात जुलैपर्यंत देशातली पावसाची तूट १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा
अधिक पाऊस झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्टमध्ये अल निनोचा प्रभाव
सौम्य ते मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या
पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, तसंच कृषी निविष्ठा आणि अत्यावश्यक अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र
आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम करावं, अशा सूचना देण्यात आल्या. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.
पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कृषी, ऊर्जा, आरोग्य, ग्रामविकास, आर्थिक व्यवहार आणि ग्राहक व्यवहार
मंत्रालयांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
****
नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील वीस वर्षापासून प्रलंबित
असलेला प्रश्न सुटला असून, महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी
पाच टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी
महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील
जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
कोकणातील कातळशिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं
काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल
विधानसभेत दिली. राज्यातल्या नऊ कातळशिल्प स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा
यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी एक ऑगस्ट पासून
नवीन नियमावली लागू होईल, त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
****
राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अनेक
जिल्ह्यांत संततधार कायम आहे. नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क असून विविध ठिकाणी खबरदारीच्या
उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शहराच्या
विविध भागात पाणी साचलं असून, गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमधमेश्वरसह अनेक धरणांमध्ये मोठी पाण्याची आवक सुरू
असून टप्प्याटप्प्याने विसर्ग केला जात आहे.
**
पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन
मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च
प्राधाव्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलकी सरी बरसत
आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे बहे, नागठाणे, सांगली आणि म्हैशाळ बंधारे पाण्याखाली
गेले आहेत.
पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत
पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं उजनी धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. खडकवासला धरण पूर्ण
भरल्याने मुठा नदीपात्रात २२ हजार ८८० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज पावसाची संततधार
सुरु आहे.
**
लातूर जिल्ह्यात यंदा सहा जुलै अखेरपर्यंत ११७ मिलिमीटर
म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १६ पूर्णांक सहा दशांश टक्के पावसाची नोंद झाली. शेती आणि
जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. जिल्ह्यातल्या
लहान मोठ्या धरणांमध्ये सध्या १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
****
आरक्षणाचं उपवर्गीकरण करताना कोणत्याही जातीवर अन्याय
होऊ नये, अशी आपल्या पक्षाची भूमिका
असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी म्हटलं आहे. ते काल शिर्डी इथं पत्रकारांशी बोलत होते. उपवर्गीकरणापेक्षा, शिक्षणाअभावी आरक्षणाचा लाभ घेता
येत नाही अशा मुलांच्या शिक्षणासाठी सरकारनं एक आराखडा तयार कारावा, असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं.
****
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी अपहाराच्या निषेधार्थ
काँग्रेस पक्षानं काल अनेक ठिकाणी 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन केलं. लातूर इथं काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली
गंजगोलाई इथल्या मंदिरात महाआरती तसंच भजन करून या अपहाराचा निषेध करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment