Thursday, 2 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची या तीन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर असून, त्यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पारंपरिक लष्करी इतमामात औपचारिक स्वागत करण्यात आलं. नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान ताकाइची यांच्या उपस्थितीत भारत-जपान वार्षिक शिखर परिषद पार पडणार आहे. या परिषदेत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेतला जाणार असून, विविध विषयांवर चर्चा आणि अनेक महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांच्या स्वागत करताना, भारत आणि जपान इंडो-पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

****

भारतात व्हॉट्सॲपवर युजरनेम हे फिचर सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत तीन दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सॲप वापरताना केवळ युजरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसर्याचं युजरनेम वापरुन होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे, अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरुन हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ५७ दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

****

देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत काल नवव्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात ते बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'एक देश, एक कर' या संकल्पनेतून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली, या सुधारणेमुळे अप्रत्यक्ष करप्रणाली अधिक सुलभ झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

जळगाव जिल्ह्यात अंमळनेर इथल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात काल रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी दिंडी अर्धवट सोडून परतण्याऐवजी वारकरी परंपरेचं पालन करत प्रवास सुरू ठेवला. आगीमुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झाल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

****

त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा काल नाशिक शहरातल्या गणेशवाडी इथं मुक्काम होता. त्याठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांना चरणसेवा देण्यात आली. त्याचा अडीच हजारांवर वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यात पायांची मॉलिश करून देण्यासह प्रथमोपचार करून गोळ्या, औषधं देण्यात आली.

****

कृषी दिनानिमित्त काल नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात १२ कृषी स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचं सादरीकरण करण्यात आलं. नाशिकच्या जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, राज्य शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, महाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

****

राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज पालघर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत उत्तर आणि दक्षिण कोकण, मराठवाडा तसंच पूर्व आणि पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे, जिल्ह्याच्या पूर्व भागासह पश्चिम किनारपट्टी परिसरात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची तीव्रता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीरकरण्यात आली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...