Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
संसदेत
'नीट' सह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, राज्यमंत्री डॉ
जितेंद्रसिंग यांचं प्रतिपादन
·
भविष्यात
प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित
प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
·
सहा
बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
·
राज्यातल्या
१७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य
मंत्रिमंडळाची मान्यता
आणि
·
मराठवाड्यात
अनेक भागात संततधार पाऊस,
आजही बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज
****
नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास
सरकार तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी
सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे
यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पंतप्रधानांच्या
निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. त्यानंतर ते बोलत होते. जितेंद्र सिंग यांनी
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा
केली. याप्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा अर्ज काँग्रेसनं दिलेला नसल्याचं सिंग
यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट
- पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग
नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन
सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं दिल्ली
पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेऊन, काही
वेळानंतर सोडून दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
**
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर विविध
मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज
कालही वारंवार व्यत्यय आल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व
संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय
पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध
कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या
निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या
सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना कठोरात कठोर शिक्षा
झाली पाहिजे,
असंही पंतप्रधानांनी सांगिल्याची माहिती संसदीय कार्य
मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले..,
बाईट
- संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू
संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी
कामकाजात सहकार्य करावं,
असं आवाहन रिजीजू यांनी केलं.
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सहा बंडखोर खासदारांच्या
शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला, शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश
न्यायमूर्ती सूर्यकांत,
न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली
यांच्या पीठासमोर देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली असून तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.
****
मतदार यादी पुनरिक्षणाच्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या
उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका वर्षभर पुढे ढकलता येणार नाहीत, असं
सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी
या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का, हे स्पष्ट करावं, अशी
सूचना न्यायालयाने काल राज्य निवडणूक आयोगाला केली.
****
डासांमुळे उद्भवणाऱ्या ‘डेंग्यू’ या आजारावरच्या 'कुडेंगा' या
लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने परवानगी दिली आहे. डेंग्यू
प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून, ४
ते ६० वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी
देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक
तत्वावर आकांक्षित तालुका विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल
झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड, आणि
परभणी यासह १० जिल्ह्यांतल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या
वर्षासाठी पाच कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुकमे १० कोटी, आठ, सहा, चार
आणि दोन कोटी रुपयांचे एक ते पाच पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व
क्षेत्रातल्या एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी २१, १५
आणि ११ कोटी रुपयांचे तीन पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या
मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा
संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील.
**
लोकायुक्त कार्यालयातल्या १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास
कालच्या बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लोकायुक्त तसंच उप लोकायुक्त
कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे.
****
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज माजी उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जाहीर व्हावी, यासाठी
विशेष प्रयत्न सुरु असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितलं आहे. काल मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका
छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्धाटनानंतर बोलतांना ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य
साधत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आज राज्यभरात देवाभाऊ कृषी माऊली
सोहळा हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत चार हजार शहरी
महिलांना किचन गार्डन किट तर चार हजार ग्रामीण महिलांना कृषी माऊली किटचं मोफत
वाटप केलं जाणार आहे.
****
तुळजापूर इथं ८४१ एकर जमिनीवर एसटी महामंडळ राज्यातला पहिला
सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी
दिली. आगामी काळात इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात असे प्रकल्प सुरु करण्याचं नियोजन
असल्याचं ते म्हणाले. हा उपक्रम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरातून एसटी महामंडळाच्या
आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण
संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होईल, असा
विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रुग्णालय- घाटीच्या परिसरात सुसज्ज सात मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनाने
मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्त्वावर राबवला जाणार आहे.
राज्यातल्या एकूण सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा
उभारल्या जाणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन
शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काल बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त
अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. हे अभियान ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येत
आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य
करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केलं. त्या
म्हणाल्या...
बाईट
- जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर
या अभियानासंदर्भात लाटकर यांनी दिलेली संपूर्ण माहिती, आमच्या
प्रासंगिक या सदरात आज आपल्याला ऐकता येईल.
****
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला
२० टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल जालना इथं आंबेडकरी समाजाच्या
वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या
मोर्चात सहभागी झाले होते.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर
शहर आणि परिसरात,
तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून
पावसाची संततधार सुरु आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस सुरू असून,
खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतीसाठी
आवश्यक ओलावा निर्माण झाला असला, तरी जिल्ह्यातल्या सुमारे ६० टक्के
क्षेत्रावर अद्यापही पेरण्या बाकी असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
नाशिकच्या घाटमाथा परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. इगतपुरीत
सर्वाधिक १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव
आदी तालुक्यांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.
****
हवामान
मुंबई, नाशिक, पुणे तसंच
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, पालघरसह
कोकणातले सर्व जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यात काही भागाला ऑरेंज अलर्ट तर पुणे
जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती
संभाजीनगर,
जालना, बीड, परभणी, हिंगोली
आणि नांदेड जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment