Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन नीलेकणी यांच्या
अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना
·
सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा
निर्धार अधिक दृढ करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन
·
महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा
मुख्यमंत्र्यांचा संकल्प
·
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला
सुवर्ण पदक, स्पर्धेत भारताची आतापर्यंत चार पदकांची कमाई
आणि
·
नाशिकहून जायकवाडी धरणात विसर्ग सुरु, पाणीसाठा ५५ टक्क्यांपर्यंत
****
परीक्षा सुधारणांसंदर्भात प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन नीलेकेणी यांच्या अध्यक्षतेखाली
उच्चाधिकार प्राप्त कृती दल स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केली. काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी, हा कृती दल परीक्षा प्रणाली
अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे, भविष्यातल्या परीक्षांची विश्वासार्हता
सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावले उचलली जातील, असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले,
बाईट - प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
****
सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमाचा १३६ वा भाग काल
प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना त्यांनी, कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा
आपल्या सैनिकांचा ताठ कणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं सांगत, हुतात्म्यांना अभिवादन केलं.
भारतीय संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मोठी झेप घेत असल्याचं सांगताना स्वदेशी
युद्धनौका, पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट आणि कुश क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांचा पंतप्रधानांनी
यावेळी उल्लेख केला.
‘कॅच द रेन’ मोहिमेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचं कौतुक
करत त्यांनी, पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं. नाशिकमध्ये जलसंधारणासाठी
सुरू असलेल्या उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले,
बाईट - प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्त
अभिवादन करत, त्यांनी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आणि आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं
आवाहन त्यांनी केलं.
भारतीय अंतराळ क्षेत्रातलं ऐतिहासिक यश, क्रीडा क्षेत्रात तसंच विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये
भारतीयांची उल्लेखनीय कामगिरी, ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान, भारतीय संस्कृती आणि परंपरेशी
जोडलेले विविध उपक्रम, राष्ट्रीय हातमाग दिन आदी मुद्यांचाही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला.
****
२७ वा कारगिल विजय दिवस काल साजरा करण्यात आला. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात
भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजवत पाकिस्तानचा पराभव केला होता. संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह यांनी लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं.
दहशतवादाविरोधात भारताचं धोरण स्पष्ट असल्याचं सांगत, भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा
झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी
पाकिस्तानला दिला. भारत आपली संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भरता सातत्यानं मजबूत करत
असल्याचं सांगत, राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैनिकांची जबाबदारी नसून १४० कोटी देशबांधवांचं सामूहिक
कर्तव्य आहे, असं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं.
**
राज्यात सर्वत्र कारगिल विजय दिवस साजरा करुन, हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कारगिल स्मृती उद्यानात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं. या स्मृतीवनाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी
शासनाने सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, हे स्मृतीवन केवळ उद्यान नसून राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि शौर्याचं जिवंत
स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, असं सावे यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक, छावणी चौकासह विविध ठिकाणी हुतात्मा सैनिकांना
अभिवादन करण्यात आलं.
लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल इथल्या हुतात्मा
स्मारकावर अभिवादन करण्यात आलं.
****
महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं मुख्यमंत्री सहाय्यता निधी
आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, यांच्या समन्वयाने आयोजित महाआरोग्य शिबिरात ते काल बोलत
होते. समाज निरोगी राहावा आणि पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाआरोग्य शिबिरामागची भुमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री
म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र आणि राज्य सरकारच्या 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन
आरोग्य योजने'च्या माध्यमातून राज्यातल्या १२ कोटी नागरिकांना युनिव्हर्सल आरोग्य संरक्षण देण्यात
आलं आहे. या योजनेंतर्गत १२०० वरून २३०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार
मोफत उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता
दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण-अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं
आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आजची ‘जेन-झी’, सरकारला आव्हान देऊ शकते, हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने
सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या यादीनुसार धाराशिव
जिल्ह्यातल्या ४६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात जवळपास ३० हजार
शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, जिल्ह्यातल्या ७५ ते ८० हजार शेतकऱ्यांचं प्रत्येकी दोन
लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेतून माफ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या एक लाख
६४ हजार शेतकरी ग्राहकांचं दोन हजार ८०० कोटी रुपयांचं थकीत कृषी पंप विज बिलही माफ
होत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
****
ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या
मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात १९० किलो वजन उचलून
मीराबाईने विक्रमी कामगिरी केली. तीने स्नॅच प्रकारात ८५ किलो आणि क्लीन ॲण्ड जर्क
प्रकारात १०५ किलो वजन उचलून राष्ट्रकूल स्पर्धतले नवीन विक्रम प्रस्थापित केले. उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. या
स्पर्धेत भारताने काल दोन रौप्य पदकांची देखील कमाई केली. भारोत्तोलनच्या पुरुषांच्या
६० किलो वजनी गटात ऋषिकांता सिंहनं, तर ६५ किलो वजनी गटात राजा मुथुपंडी यांनी रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी
एकूण चार पदकं जिंकली आहेत.
****
भारताने तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला ३५ धावांनी हरवत तीन
सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय
संघाने प्रथम फलंदाजी करत १९३ धावांचं लक्ष्य दिलं. वैभव सूर्यवंशीने ४९ चेंडुत ८१
धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा संघ २० षटकात १५७ धावांवर सर्वबाद
झाला.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आाहे.
गंगापूर धरणातून चार हजार ९४७, दारणा धरणातून १३ हजार २५०, तर नांदूर मधमेश्वरमधून ४६
हजार २२७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे.
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार
पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५५ पूर्णांक ४९ टक्क्यांपर्यंत
पोहोचला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment