Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार, तसंच सामाजिक सुरक्षा करार आजपासून
लागू झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हा दिवस भारत-ब्रिटन
संबंधांतील महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. या करारामुळं भारताच्या सुमारे 99 टक्के निर्यातीला शून्य शुल्कासह ब्रिटनच्या बाजारपेठेत
प्रवेश मिळणार असून वस्त्रोद्योग, चामडे, रत्न-दागिने, अभियांत्रिकी उत्पादने, सागरी उत्पादने, रसायने, प्रक्रिया केलेले अन्न, एमएसएमई, शेतकरी आणि उत्पादकांना मोठी संधी
उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या करारामुळं
माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक, वित्तीय, शिक्षण आणि सेवा क्षेत्रांनाही चालना
मिळेल. तसेच सामाजिक सुरक्षा करारामुळे ब्रिटनमध्ये तात्पुरते कार्यरत भारतीय व्यावसायिकांना
पाच वर्षांपर्यंत दुहेरी सामाजिक सुरक्षा अंशदानातून सूट मिळणार आहे.
****
दरम्यान, भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली
फेरी काल यशस्वीरित्या पार पडली. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध विस्तारण्याच्या
दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
दोन्ही देश निष्पक्षता आणि परस्पर सहकार्याच्या तत्त्वांवर आधारित व्यापक, संतुलित आणि सर्वसमावेशक करारासाठी
प्रयत्नशील असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं.
****
ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या दोन
दिवसीय बाराव्या परिषदेला आजपासून हैद्राबाद इथं सुरूवात होत आहे. केंद्रीय कामगार
आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स
देशांचे कामगार आणि रोजगार मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. सामाजिक सुरक्षेला
प्रोत्साहन देणे, कामगार क्षेत्राचे सुसूत्रीकरण
करणे आणि कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा
होईल. कामगार धोरणे, कौशल्य विकास, कामगार कल्याण आणि सर्वसमावेशक रोजगार या क्षेत्रांमध्ये ब्रिक्स देशांमधील सहकार्य
अधिक दृढ करणे, हा या बैठकीचा उद्देश
आहे.
****
नासाचे भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह
दोन रशियन अंतराळवीर आजपासून आठ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी
कझाकस्तानमधून सोयुझ एमएस-२९ या अंतराळयानातून उड्डाण केले. अनिल मेनन यांचा हा पहिलाच
अंतराळ प्रवास आहे. या काळात अनिल मेनन वैज्ञानिक संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी
यांसारखे प्रयोग करतील, जे भविष्यातील अंतराळ मोहिमा आणि पृथ्वीवरील जीवनासाठी उपयुक्त ठरतील अशी माहिती
नासा संस्थेनं दिली आहे.
****
अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा कायद्याची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक
जनजागृती करावी. अशा सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर
इथं काल या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठित विभागीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, जनजागृती उपक्रम आणि उपलब्ध निधीच्या वापराचा विभागनिहाय
आढावा घेतला. जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमित घेऊन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी
करण्याच्या सूचना यावेळी जी. श्रीकांत यांनी दिल्या.
****
नाशिक जिल्ह्यात सावळगाव इथं काल रात्री ट्रक आणि कार
यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात
कार मध्ये असलेले प्रवासी वणी येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन गुजरातला परतत असताना
पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला धडक दिल्याने ही कार पुढे चालत असलेल्या ट्रकच्या खाली
शिरली, त्यामुळे हा अपघात झाल्याचं
पोलिसांनी सांगितलं.
****
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात उद्या, गुरुवारपासून तीन ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी
चोवीस तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. आषाढी यात्रेसाठी सुमारे वीस लाख भाविक येण्याचा
अंदाज असल्याची माहिती मंदिर समितीनं दिली आहे.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत स्पेनने अंतिम फेरीत
धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या पहिल्या सामन्यात स्पेनने फ्रान्सचा
दोन – शून्य असा पराभव केला. या विजयामुळं स्पेन सलग ३७ सामन्यांमध्ये अपराजित राहिला
आहे. तर, २०१० नंतर पहिल्यांदाच
त्यांनी विश्वचषकाची अंतिम फेरीत गाठली आहे. दुसरा उपान्त्य फेरीचा सामना आज अर्जेंटिना
आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल टोकियो इथं सुरुवात
झाली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग
चिंगचा २१-१४; २१-११ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीमध्ये तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीनं स्कॉटलंडच्या जोडीचा
पराभव केला.
****
आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन
म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरसह राज्यात अनेक सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment