Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून
कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं
म्हटलं आहे. २०१३-१४ मधील दीड टक्क्यांपेक्षा कमी असलेलं इथेनॉल मिश्रण २०२५-२६ मध्ये
२० टक्क्यांवर पोहोचलं असून भारतानं हे उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा पाच वर्ष आधी गाठलं
आहे. २०१४-१५ पासून मे २०२६ पर्यंत या कार्यक्रमामुळं १ लाख ९० हजार कोटी रुपयांहून
अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. या कालवधीत ३१० लाख मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या
तेलाची आयात टळली असून सुमारे ९३० लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट
झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं
आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळं वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही
वैज्ञानिक आधार नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. एसआयएएम, एआरएआय आणि इंडियन ऑइलच्या
व्यापक चाचण्यांनंतरच ई-20 इंधनाला मान्यता देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं असून, ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या
हितासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पुढंही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सवलतप्राप्त भविष्य निर्वाह निधी चालवणाऱ्या
आस्थापनांना त्यांचा दर्जा नियमित करण्यासाठी एक-वेळची संधी देणारी माफी योजना, २०२६ सुरू केली आहे. कामगार
आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं की, ही योजना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी
खुली राहणार असून ही योजना आयकर कायदा, १९६१ अंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य
निर्वाह निधी विश्वस्त संस्था चालवणाऱ्या आस्थापनांना लागू आहे. पात्र आस्थापनांनी
संबंधित प्रादेशिक कार्यालयात ईमेलद्वारे औपचारिक अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक नाव उलटून
झालेल्या दुर्घटनेतील मृतांची यादी भारतीय दूतावासानं जाहीर केली आहे. मृतांपैकी १०
जण तामिळनाडूचे, ३ जण आंध्र प्रदेशचे आणि २ जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं
प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
****
महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं
आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा
प्रारंभ आज उरळीकांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि
बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध
योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसच महिलांच्या हक्कांविषयीची
माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष
उपक्रम हाती घेतला आहे.
****
गेल्या दहा दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषदेतील
६० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधातलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. गेल्या
दोन महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत
साहित्याचा पुरवठा न होणं याविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे.
****
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्य लढती निश्चित झाल्या आहेत. पहिला उपांत्य
फेरीचा सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन असा १४ तारखेला अमेरिकेत डॅलस इथं होईल तर दुसऱ्या
उपांत्य लढतीत १५ तारखेला इंग्लडचा संघ अर्जेंटिनाविरुद्ध अटलांटा येथे झुंज देईल.
****
विम्बल्डन २०२६ पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावण्यासाठी आज जागतिक क्रमवारीतील अव्वल
टेनिसपटू आणि सर्वात अलीकडील ग्रँड स्लॅम विजेता यांच्यात सामना रंगणार आहे.
इटलीचा यॅनिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात कारकिर्दीतील हा
१५ वा सामना असून, ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्यांची ही दुसरी लढत
असेल. महिला एकेरीमध्ये काल २१ वर्षीय चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हाने आपल्या कारकिर्दीतील
पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं.
****
No comments:
Post a Comment