Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· रामजन्मभूमी देणगी अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची
सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस
· अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि
सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
· सासवड–जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकने दिलेल्या धडकेत तीन
वारकरी महिलांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे मदत जाहीर
आणि
· लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर
ऐतिहासिक विजय
****
अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या
वस्तूंचा अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला तसंच
राममंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा
बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची, आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या
प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासपथकानं चौकशीच्या प्रगतीचा
अहवाल सादर करावा असंही न्यायलयाने सांगितलं आहे.
****
उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला
आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकाने बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना
डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात २ जुलै रोजी
दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरु असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने
पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून
संशयित आरोपींचा शोध सुरु केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात
आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरु केली आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. विविध हितसंबंधीनी
दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे.
इच्छूकांनी २७ जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं
आहे.
****
शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव
अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज
फंड अभियानाच्या आराखड्यावर आज मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते.
यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता
यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली
आहे,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या
काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
दरम्यान, कामगारांसंबंधी विविध
कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक 'कामगार
हित'
जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत झालेल्या या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते.
केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी
काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
****
स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात
दिल्लीत जेएनयू आणि जंतरमंतर परिसरात
कॉकरोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या
आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज
जाहीर पाठिंबा दिला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित
विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई मिळावी, ही आंदोलकांची मागणी
योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या २० जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या
मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे
यांनी सांगितलं.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरोनं गगनयान मोहिमेशी
संबंधित क्रु मॉड्युल प्रणालीच्या तीन महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण
केल्या. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या
तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु
बंद असलेल्या सहा वसतिगृहांना गेली चार वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं
नियंत्रक आणि महालेखापरीक्षक - कॅग च्या अहवालात म्हटलं आहे. यातली चार वसतिगृहे
जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलडाणा जिल्ह्यात एकेक वसतिगृह असल्याचं अहवालात
म्हटलं आहे. गेली चार वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या
सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना दीड कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिल गेलं
असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून
विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. २०२०
सालापर्यंत २०० वसतिगृह बांधण्याचं सरकारच उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही
पूर्ण झालेलं नाही असं अहवालात म्हटलं आहे
****
पुणे जिल्ह्यात सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक
दिल्यामुळे तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार वारकरी जखमी
झाले असून,
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक
चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली
जिल्ह्यातल्या कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी होत्या.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार
यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, जखमी
वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या
वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी
वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी, असं
आवाहन पवार यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख
व्यक्त केलं असून, मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली
आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची
मदत जाहिर केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दु:ख
व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून, पंढरीच्या वारीमध्ये
संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित
यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीने आज बीड जिल्ह्यात
हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथ वंशजांना विना बैलाच्या
गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. या वेळी शेकडो
तरुण,
भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर
नाथ वंशजांचा सन्मान करण्यात आला.
****
बीड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज तहकुब करण्यात आली.
मंजूर ठरावांची आणि चालू कामांची माहिती दिली नाही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक
झाले. मंजूर ठरावांची आणि कामकाजाची सविस्तर माहिती प्रत्येक नगरसेवकापर्यंत
पोहोचणे गरजेचे आहे. ही संपूर्ण माहिती समोर येत नाही, तोपर्यंत
कोणत्याही गोष्टीला मान्यता देणार नाही, असं भाजपच्या
गटनेत्या डॉ.सारिका क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
****
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने
बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन तरुणांना मुंबई-अग्रा महामर्गावर अटक
करुन ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गेल्या २० दिवसात धुळे शहरातील तिसरी
तर जिल्ह्यातील ही चौथी अवैध शस्त्र विरोधातील ही कारवाई असून अशा प्रकारे शस्त्र
पुरवठा करणाऱ्या मूळ स्त्रोताचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विशाल
आनंद यांनी दिली.
****
विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व
शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण
हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केलं आहे. विद्यापीठ आणि संलग्न
महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असेही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात
महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत उपस्थित
प्राचार्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
****
५६व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमधे प्रथम
क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन
केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं
पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा
कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह ५ जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या
स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही या मुलांचं अभिनंदन केलं आहे.
****
टीईटी पेपर फुटी प्रकरणात अटक असलेल्या दोन
आरोपींना आज भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या
प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांची रवानगी न्यायालयीन
कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी अजूनही फरार असून
पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
****
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये येत्या २० जुलैपासून अग्निभरती मेळावा
सुरु होणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन सामायिक प्रवेश
परीक्षा -CEE यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी
हा मुंब्रा इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलात हा मेळावा होणार आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यावर्षी
बीसीए आणि एमबीए हे दोन शिक्षणक्रम ऑनलाईन सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसी आणि
दूरस्थ शिक्षण मंडळ-डीइबी यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार
हे शिक्षणक्रम राबवण्यात येणार असल्याचं विद्यापीठातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट
संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने यजमान
इंग्लंड संघाला १८६ धावांतच सर्वबाद करून, कसोटी
२७० धावांनी विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment