Monday, 20 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ;विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजात व्यत्यय

·      अधिवेशनातल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी सहभागी व्हावं-पंतप्रधानांचं आवाहन

·      कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनात राज्यात ठिकठिकाणी विविध पक्षांचं आंदोलन

·      अहिल्यानगर इथं गावठी पिस्तुलं विकणाऱ्या दोघांना अटक;पाच पिस्तुलं हस्तगत

·      बीड इथं पोक्सो प्रकरणातील आरोपी रियाज जमील शेख याला जन्मठेपेची शिक्षा

आणि

·      समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यात कार आणि ट्रक अपघातात ५ जणांचा मृत्यू

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राममंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरुन दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ केला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज अडीच वाजेपर्यंत आणि नंतर ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरु झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ३४ वरुन ३८ पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे अमीर शेख हमद बिन खलिफा अल-थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. यामध्ये सुष्मिता देब, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा समावेश आहे.

****

संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशाने विकासाचा वेग पकडला असून, संसदेतील सकारात्मक, तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी, गेल्या महिनाभरात भारताने अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत, दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

नीट पेपरफुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद मार्च काढण्यात आला. या गर्दीवर नियंत्राणासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. दरम्यान, संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं.

****

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं आज क्रांती चौक परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, तसंच कार्यकर्ते उपस्थित होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी सहभागी झाले.

राज्यात नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, नाशिक, यासह अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलन करण्यात आलं

****

प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक आज झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

****

नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपारिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी तीन वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी सलग्न एक हजाराहून अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्याने हे काम सध्या स्थगित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहिल्यानगर इथं गावठी पिस्तुलं विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेली सुमारे ११ लाख रुपयांची पाच पिस्तुलं स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केली. वडगाव गुप्ता शिवारात ही कारवाई करण्यात आली.

****

बीडच्या विशेष सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील आरोपी रियाज जमील शेख याला जन्मठेपेची शिक्षा तसंच दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या शिक्षेसोबतच एक वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षाही रियाज शेख याला सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी ही माहिती दिली. रियाज शेख विरुद्ध दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने पुरावे प्रभावीपणे मांडल्याने आरोपीची दोषसिद्धता होऊन, न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

****

दरम्यान, वर्धा जिल्ह्यात रोठा इथं १२ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सादर केलेल्या या बाबीची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत, विधी आणि न्याय सचिवांना यासंदर्भात तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

****

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज वर्धा जिल्ह्यात कार आणि ट्रक यांच्या धडकेत झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे तीनच्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

****

समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या २०३ वर्गखोल्यांना २२ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्गखोल्यांचा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न दाखल केला होता.

****

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पादुका पूजन आणि अश्वपूजन करून पालखीचं स्वागत केलं. अकलूज इथं पालखीचा गोल रिंगण सोहळा झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कवेदंड इथं चौथा रिंगण सोहळा पार पडला. ही पालखी आज कुर्डू इथं मुक्कामी पोहोचेल, उद्या पालखी अरण कडे प्रस्थान करेल.

****

छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे राम शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज ही निवड प्रक्रिया पार पडली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी धाराशिव इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाभर “वृक्षारोपण आणि संगोपन अभियान” सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान एक झाड लागेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

****

परभणी इथं येत्या २४ जुलैला ‘नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी राष्ट्रव्यापी अभियान’ होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दिंडोरीचे श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

हवामान

मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसह कोकणात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...