Friday, 10 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. भारतात तंत्रज्ञानासोबतच खेळांचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी, 'खेलो इंडिया' ते ऑलिम्पिकच्या यजमानपदापर्यंत, भारताचा क्रिडा संकल्प मांडला. 'खेलो इंडिया'मुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबांतल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं असल्याचं ते म्हणाले. भारताकडे २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद असून, २०३६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

आगामी काळात 'बिग बॅश लीग'चा एक कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी केली. खेळ हा सीमा आणि संस्कृतींच्या पलीकडे जाऊन मैत्री दृढ करतो, असं प्रते म्हणाले. 'बिग बॅश लीग'च्या चेन्नईतल्या आयोजनावर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

****

सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून, हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रति टीलर सुमारे २० रुपयांनी स्वस्त असेल, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेष तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल, असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव–इंधन धोरणाचं समर्थन केलं.

****

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारताने संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात सी आर एस व्ही चा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करुन घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दु:ख पोहचवणार्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो, असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरुच असून, भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो, असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत, २०२५ मध्ये अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं, त्याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही पी हरीश म्हणाले.

****

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षित ठेवण्यात आलेल्या डीएपी खताच्या साठ्याचं वितरण करण्यास परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलं. खत खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे तसंच अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकार्यांनी केलं आहे.

****

स्पेन मधल्या माद्रिदमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व्ह मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपान्त्य फेरीत चीनकडून पाच गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली असल्याने पदक निश्चिती झाली आहे.

****

भारताचा १८ वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याचं विम्बल्डन कनिष्ठ गटातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याने अर्णवचा दोन-पाच, पाच-सात असा पराभव केला. दरम्यान, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा गेल्या ३६ वर्षातला अर्णव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

****

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा सात लाख तीन हजार २६० दशलक्ष लिटर इतका आहे. हा साठा सातही धरणांच्या एकूण क्षमतेच्या ४८ पूर्णांक ५९ टक्के इतका आहे.

****

नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक झाल्याने पैठणच्या जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा ३० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला असून, नागमठाण धरणातून विसर्ग सुरू आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...