Thursday, 23 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित

·      सरकारची संसदेत चर्चेची तयारी असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं निवेदन, तर, स्थगन प्रस्ताव आणून चर्चेची काँग्रेसची मागणी

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक ५३२ शेतकऱ्यांची यादी जाहीर

·      कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजूरी

आणि

·      नाशिक जिल्ह्यातल्या नांदुरमध्यमेश्वरसह आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग, आजही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

****

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेत के सी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली. तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी याप्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सरकारची या मुद्यावर चर्चेची तयारी असल्याचं लोकसभेत सांगितलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने सदनांचं कामकाज आधी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दोन वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर, तालिका अध्यक्षांनी, खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली. महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

राज्यसभेत मात्र गदारोळामुळे दोन वाजेनंतर कामकाज पुन्हा तासभर स्थगित करावं लागलं. कामकाज सुरू झाल्यानंतर रिजीजू यांनी यासंदर्भात बोलतांना, काँग्रेस पक्षाच्या वतीने चर्चेची तयारी असल्याचं दाखवलं जातं, मात्र वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांनी चर्चा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजीजू यांनी केलं. ते म्हणाले,

बाईट- संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू

 

रिजीजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत बोलतांना सदनाचे नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांची वर्तणुक बेजबाबदारपणाची आहे, अशी टीका केली.

**

दरम्यान, काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी, संसदेत स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, त्या म्हणाल्या,

बाईट- काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी

**

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधत, आपली भूमिका स्पष्ट केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि या कारवाईबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागावी, या तीन मागण्यांवर आपण ठाम असल्याचं गांधी यांनी सांगितलं.

**

दरम्यान, याच मुद्यावरून काल काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परस्परांविरोधात काल आंदोलनं करण्यात आली. मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीने शहागंज परिसरात इथं गांधी भवन, तर काँग्रेस पक्षानेही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली.

बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या वतीने निदर्शनं करण्यात आली, तर माजलगाव इथं विद्यार्थी, समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली.

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीने सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत, उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं.

****

नीट निकालातील गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून राष्ट्रीय परिक्षा संस्थेकडून स्पष्टीकरण मागवावं, अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली.

दरम्यान, दिल्लीतल्या आंदोलनावर कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

मध्यप्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाइड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या दोन राइस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल राइस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. या बहुचर्चित फोर्टिफाइड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी आरोपींची संख्या १० वर पोहचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काल लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती सचिन अहीर, यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.

छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, आदी ठिकाणाही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं.

**

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रातिनिधिक ५३२ शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालयं तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम DBT व्दारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातल्या ५७ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला.

छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, हरित महोत्सव आदी उपक्रम राबवण्यात आले.

****

कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त ५० अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याच्या दिशेने वळवण्याच्या योजनेला आता गती मिळाली आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल' तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी २४ कोटी पाच लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.

दरम्यान, धाराशिव - बीड - छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गासाठी डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे.

****

पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काल सोलापूर शहरात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं.

दरम्यान, माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपानकाका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा झाला, तसंच ठाकूर बुवा समाधी इथं माऊलींच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगणही काल साजरं झालं.

****

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे दारणा, गंगापूर, नांदुरमध्यमेश्वरसह लहानमोठ्या आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर मधून चार हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे.

**

कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसराला रेड अलर्ट तर विदर्भ आणि खान्देशात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...