Thursday, 16 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय

·      भारत-युके यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार लागू 

·      मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता; युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण तसंच सेमिकॉनचा पुढचा टप्पाही मंजूर

आणि

·      संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान तर संत श्री गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरमध्ये

****

छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचं काम गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. कंत्राटदाराने आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावं,या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी शहरात ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यापैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात एक हजार ९११ किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी एक हजार २९१ किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं असून, ४६ हजार ५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

****

साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या वीजेचं शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

आज कर्जमाफीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना ९५ हजार कोटी रूपयांचं सहाय्य दिलं जात असून, शेतीक्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी, तापी खोऱ्यांत यावं यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे २४ नवी धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच, दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं २०० टीएमसी पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

भारत-युनायटेड किंगडम यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार कालपासून लागू झाला. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून यूकेमध्ये होणाऱ्या ९९ टक्के निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरवात करण्यात आली. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

****

६२ हजार ५०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार असून, याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर सव्वा दोन ते पाच टक्कयांपर्यंत सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास दीड टक्कयांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे ३९ लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचे उत्पादन होण्याची अपेक्षा असून, ६० हजार जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट –केंद्रीय मंत्री माहिती आणि प्रसारण ,अश्विनी वैष्णव

 

भारताच्या सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने सेमीकॉन २.० ला मंजुरी दिली असून, त्यासाठी एकूण एक लाख २७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं, हे याचं उद्दिष्ट आहे.

आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळाने युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण-२०२६ मंजूर केलं. देशात गॅस-आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून, आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना काल नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. पुढील तीन दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात आहे. आज चांदोबाचा लिंब इथं पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे.

दरम्यान, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. 

****

शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचे दर्शन घेतलं. आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे.

संत नामदेव महाराजांच्या पालखीचं काल अंबाजोगाई इथं आगमन झालं. पालखीचा पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा यावेळी पार पडला.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्स्प्रेसचं बोईंग ७३७ मॅक्स ८ हे अत्याधुनिक विमान अबू धाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली.

****

परभणी इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दूध भेसळीविरोधात कारवाई केली. शहरातल्या वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसंच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या नऊ विक्रेत्यांकडून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

****

जालना शहर महानगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार काल मंगळबाजार आणि भिकारी चौक परिसरातली ५२ अनधिकृत अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच अतिक्रमण हटविण्याचा खर्चही वसूल केला जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

****

राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पुरातन स्वरूप प्राप्त व्हावं, यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले

****

मृगबहार २०२६ फळ पीक विमा योजनेत परभणी जिल्हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आहे. या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत तब्बल ८१ हजार ५२३ विमा अर्जांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढून पीक संरक्षित करण्याचं आवाहन कृषि विभागाने केलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी काल महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेने अध्यापन करावं, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

राज्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद याठिकाणीही काल संध्याकाळच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...