Monday, 20 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन, २५ दिवसांच्या अधिवेशनात १९ सत्रांचं आयोजन

·      सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

·      आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं घेतला पूर्वतयारीचा आढावा

·      पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

आणि

·      आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदकं

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू होत आहे. १३ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १९ सत्र होणार असून, महत्त्वाच्या विधेयकांवर आणि राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या या बैठकीत, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ, विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा त्याग केला. मात्र,  निषेध नोंदवल्यानंतर सुमारे ५० खासदार बैठकीत सहभागी झाले.

**

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसद जितक्या अधिक कार्यक्षमतेनं चालेल, तितकं ते देशासाठी अधिक चांगलं ठरेल. सततच्या गोंधळामुळे यापूर्वी संसद चालवणं खूप कठीण झालं होतं, याची आठवण त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना करून दिली. सरकार विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकण्यास तयार आहे आणि त्यांनीही सरकारचं म्हणणं ऐकावं, अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली.

****

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. या मागणीसाठी वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचूक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे, आरोग्याच्या कारणावरून वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे.

वांगचूक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २४ जुलैला होणार आहे.

**

दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्ष आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आंदोलन केलं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा, असं पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देशाच्या भविष्यासाठी सर्व मतभेद सोडून सगळ्यांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं, तसंच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

****

आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपूर इथं पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं यासाठी दर्शन व्यवस्थेची तसंच मंदिर संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन २४ तास सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना, स्थानिक व्यापारी आणि पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसून, सर्वांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. वारीच्या काळात आरोग्य शिबिरांची संख्या वाढवण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. तसंच सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर आकर्षक पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

नीट-युजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागानं काल दुसऱ्या दिवशीही आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसची चौकशी केली. दोन महिन्याच्या खंडानंतर कालपासून सीबीआयच्या पथकाकडून पुन्हा एकदा ही चौकशी करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणिसंग्रहालय दिवाळीनंतर मिटमिटा इथल्या नव्या जागेत स्थलांतरित करण्याच्या उद्देशानं तयारी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा इथं शंभर एकर जागेत हे प्राणिसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या ठिकाणी प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार केलं जात असून, आतापर्यंत आठ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. वन्यजीव स्थलांतर परवानगी घेण्यासाठी या महिन्याअखेरीस केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला अर्ज करण्यात येणार असल्याचंही आयुक्त येडगे यांनी सांगितलं.

****

प्रहार जनशक्ती पक्षानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका बियाणे निर्मीती खासगी कंपनीसमोर मशाल आंदोलन केलं. या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप कार्याकर्त्यांनी यावेळी केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गरीब कुटुंबाना घरकूल मंजूर होऊनही, स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या ३४ गावांतल्या एक हजार २० लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासन जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर राजस्व अभियानात या लाभार्थ्यांना जागा वाटपाचं पत्र देण्यात येणार असल्याचं, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितलं.

****

बीड शहरातल्या बार्शी नाका परिसरात बिंदुसरा नदीवरील पुल बंधारा कामाची खासदार बजरंग सोनवणे यांनी काल पाहणी केली. त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसंच काम नियोजनानुसार आणि आवश्यक दर्जा राखून पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या.

****

जालना जिल्ह्यात अंबड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काल सायंकाळी भीषण आग लागून सात दुकानं जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगीचं नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही.

****

हिंगोली जिल्ह्यात तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर:

बाईट – पीटीसी हिंगोली

**

पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती विभागाने दिली आहे. आज पुणे आणि सातारा घाट परिसरात, त्यानंतर रायगड आणि पुणे घाट परिसरात, तर उद्या मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या घाट परिसरासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात पावसाची शक्यता आहे.

****

उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं झालेल्या ५८व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत चार सुवर्ण पदकं पटकावली. ओडिशाचा देबदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांचा यात समावेश आहे.

दरम्यान, लिथुआनियातील विल्नियस इथं झालेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ स्पर्धेतही भारतीय संघानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटकावली.

****

स्पेनने फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. न्यूयॉर्क इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा एक - शून्य असा पराभव केला. स्पेनने दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे.

****

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुने जपान खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१७, २१-१७ असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...