Monday, 20 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांसह कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल-थानी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर लोकसभेत विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासात सदनात घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्षांनी शांततेत काम सुरु ठेवण्याचं आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करत, विरोधकांनी घोषणाबाजी सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.

कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, २०२६ सादर केलं. हे विधेयक सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) अधिनियम, १९५६ मध्ये पुढील सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरुच राहिल्यानं कामकाज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आलं.

**

राज्यसभेतही विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वेळा स्थगित झालं.

**

दरम्यान, अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत देशासमोरील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. नैऋत्य मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत, दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असं ते म्हणाले. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी, गेल्या महिनाभरात भारताने अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं.

देशाने विकासाचा वेग पकडला असून, संसदेतील सकारात्मक, तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. संसदेत प्रत्येक मताचा आदर राखत अर्थपूर्ण चर्चा व्हावी आणि सर्व खासदारांनी उत्साहाने कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

**

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत हाय अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही बेकायदेशीर मोर्चा किंवा विरोध प्रदर्शनाला परवानगी नसल्याचं स्पष्ट करत, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नवी दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत मोर्चे, निदर्शनं आणि पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध लागू आहेत. केवळ जंतरमंतर इथल्या निर्धारित स्थळी पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच आंदोलनास परवानगी दिली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

****

भारतीय महालेखापरिक्षक – कॅग आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद – आयसीएसएसआर यांनी संयुक्तरित्या संशोधन लेखावर आधारित एका स्पर्धेची घोषणा केली आहे. पदवी, पदव्यूत्तर तसंच पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून, लेखापरीक्षणाचे निष्कर्ष आणि सार्वजनिक वित्तविषयक बाबींवर आधारित, शैक्षणिकदृष्ट्या कसदार, धोरणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि मौलिक संशोधनास प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश आहे. एक ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना आपले लेख कॅग आणि आयसीएमएसआरच्या संकेतस्थळावर अपलोड करता येतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून, या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केलं. या उल्लेखनीय यशामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल तसंच संशोधन आणि नवोपक्रमाला नवी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

राम मंदिर दान चोरी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार ने स्थापित केलेल्या विशेष चौकशी समितीने सर्वोच्च न्यायालयासमोर आपला अहवाल सादर केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाला सादर केलेल्या या अहवालावर आज सुनावणी होणार आहे.

****

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरूळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कारमधले चार प्रवासी तसंच ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा समावेश आहे. कारमधले सर्व मृत हे वर्धा जिल्ह्यातल्या सालोड इथले रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यापूर्वी समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. अपघातानंतर परिस्थिती लक्षात घेऊन वर्धा पोलिसांनी पुढील किमान चार तास हा मार्ग टाळण्याचं आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहनचालकांना केलं आहे.

****

पंढपूरकडे जाणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आढावा घेतला. धर्मपूरी इथं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन गोरे यांनी संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...