Tuesday, 28 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला प्रारंभ  

·      गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

·      दहा तसंच वीस रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

·      परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी १६३ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता

·      मराठवाडा साहित्य परिषदेचा बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर

आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिकच्या सर्वेश कुशारेला रौप्यपदक

****

संसदेत गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत आज लोकसभेत,  सरकारनं सादर केलेल्या सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना ७ ते १० वर्षांची शिक्षा आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ५ ते १० वर्षांची शिक्षा आणि ५ कोटी रुपयापर्यंत दंड तर परीक्षा आयोजक संस्थेला ५ कोटी रुपये दंड आणि ८ वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात आहे. पेपर फुटीपासून २ महिन्यात याप्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं ३ महिन्यात सुनावणी पूर्ण करुन निकाल द्यावा, अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग

 

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलतांना, या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलतांना, पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारने उचलेल्या पावलांची माहिती देत, पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं

 

भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी यापूर्वीच्या सरकारांच्या काळात झालेल्या तसंच विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधल्या पेपरफुटीचा उल्लेख करत, विरोधी पक्ष या मुद्यावर सोयीचं राजकारण करत असल्याची टीका केली.

 

द्रविड मुनेत्र कळघमचे दयानिधी मारन यांनी नीट परीक्षा घेण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वैद्यकीय शिक्षणासाठी ही परीक्षा आवश्यक नसल्याचं सांगत, नीटसक्ती करू नये, असं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, तेलगुदेशम पक्षाचे लवू श्रीकृष्णदेवरायलु, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला.

****

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणीत, विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण, नोंदवलं. यासाठी सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये, असं न्यायालयानं सांगितलं.

दरम्यानच्या काळात या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी सूचनाही न्यायालयाने केली. यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्रसरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत.

 

दरम्यान, या आंदोलनात उपद्रव करणाऱ्या व्यक्तींबाबत दिल्ली पोलिसांनी आपला अहवाल सादर केला आहे, दोन हजार आठशे त्राहात्तर उपद्रवी व्यक्तिंपैकी नऊशे एकोणनव्वद जणांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमच्या मदतीनं ओळख पटवल्यानंतर या व्यक्तींविरोधात हत्या, दरोडे, बलात्कार आणि अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातील आदेश दिले.

****

दहा आणि वीस रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे. आज लोकसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. प्रायोगिक स्तरावरचा वापर यशस्वी झाला, तरच या श्रेणीतल्या प्लॅस्टिकच्या नोटा नियमित स्वरूपात जारी केल्या जातील, असं चौधरी यांनी सांगितलं. सध्याच्या कागदी नोटांसोबतच प्लॅस्टिकच्या नव्या नोटा जारी करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव असून, चलनात असलेल्या कागदी नोटा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही चौधरी यांनी या उत्तरात सांगितलं.

****

राज्यसभा पहिल्या स्थगितीनंतर दुपारी दोन वाजता सुरू झाल्यानंतर मंत्री जीतन राम मांझी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक सादर केलं. यानंतर विरोधी पक्षांनी विद्यार्थी आंदोलनावर कारवाईबाबत घोषणाबाजी सुरू केल्यानं, कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

****

अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.  नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथे ही न्यायालयं स्थापन होणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मादक द्रव्यं आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही आज मान्यता देण्यात आली.

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुक प्रकरणांमध्ये स्वामित्वधनाच्या दहापट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

भारतीय रेल्वेनं दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून, यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती, दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून १५ मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यावेळी उपस्थित होते. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसास्थळांवरची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकवितासंग्रह, सफर मंगळावरची हा बालकथासंग्रह, तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजीपिझ्झा, स्पायडरमॅन ह्या बालकादंबऱ्यांसह सोळा पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे.

****

ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिकच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने सव्वा दोन मीटर उंची पार केली; मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळालं आहे. पदक तालिकेत भारताला आता दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकासह एकूण दहा पदकं मिळाली आहेत.

****

भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघादरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. शुभमन गीलच्या नेतृत्वाखालील या संघात मानव सुतार आणि सारांश जैन या नवीन खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...