Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी
संयुक्तपणे प्रांबानन मंदिर संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ केला. नागरिकांनी मोठ्या
उत्साहात याठिकाणी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. हा
उपक्रम भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक
आणि सभ्यतागत संबंध अधिक दृढ करणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, इंडोनेशिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे
राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात जकार्ता इथं
द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही देशांनी
दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तीव्र निषेध करत त्याविरोधात समन्वित आंतरराष्ट्रीय
कारवाईचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या
या दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया यांच्यात कृषी, संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष,
संरक्षण आणि औद्योगिक सहकार्य यासह १४ सामंजस्य करारांवर
स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना
करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वोतोपरी मदत करेल असं आश्वासन शाह यांनी दिलं.
****
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू
काश्मीर सरकारनं नवीन सूचना जारी केली आहे. या सूचनेमध्ये
यात्रेकरुंनी नोंदणी प्रक्रिया आणि संरक्षण विषयक मार्गदर्शन सूचनांचं काटेकोरपणे पालन
करण्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्देशानुसार निश्चित केलेली दैनंदिन यात्रेकरूंची मर्यादा लागू राहील तसंच यात्रेकरूंनी
आगाऊ नोंदणी करुन, त्यांच्या परवानगीपत्रात नमूद केलेल्या
तारखेलाच यात्रा करावी, ज्या यात्रेकरूंनी नोंदणी केलेली
नाही, त्यांनी निर्धारित तारखेची वाट पाहावी, नोंदणीकृत प्रवाशांना त्यांच्या नियोजित तारखेपूर्वी प्रवास करण्याची
परवानगी दिली जाणार नाही, असं या सूचनेद्वारे सांगण्यात आलं
आहे.
****
मुंबईत JJ
आणि KEM रुग्णालयात मशीन द्वारे,
पोस्टमार्टम प्रक्रिया सुरु केली जाणार असून, ती यशस्वी झाल्यास राज्यात
सर्वत्र मशिनद्वारे पोस्टमार्टम सुरु केलं जाईल अशी
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. ९० टक्के
प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि १० टक्के गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा
दोन्ही प्रकारे पोस्ट मार्टम केलं जाईल, असं त्यांनी
सांगितलं. शव विच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं
आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
****
भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि
बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण,
संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने 'ज्ञानभारतम्'
हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलं आहे. नागरीकांनी ७५ वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं,
हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती 'ज्ञानभारतम्' ॲपवर किंवा वेबसाइटवर नोंदवून या
ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचं जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून आपल्या
पूर्वजांचा अमूल्य ज्ञानवारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात
म्हटलं आहे.
****
राज्यात पावसाचा जोर
काहीसा कमी झाला असला तरी अनेक जिल्ह्यांत संततधार कायम आहे.
नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये
प्रशासन सतर्क असून विविध ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
नाशिक शहरासह
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शहराच्या विविध भागात पाणी साचलं
असून, गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही
वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमधमेश्वरसह अनेक धरणांमध्ये मोठी
पाण्याची आवक सुरू असून टप्प्याटप्प्याने विसर्ग केला जात आहे.
नांदूरमधमेश्वर
बंधाऱ्यातून आज सकाळी नऊ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२
हजार ६२० घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू
करण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रातलं साहित्य आणि पशुधन तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन नाशिक
पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी
केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात
टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या
पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली असून, ६० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काल राधानगरी,
गगनबावडा, आजरा, चंदगड यांसह जिल्ह्यातल्या २४ ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर १७ धरण क्षेत्रांत मुसळधार पावसाची नोंद झाली.
****
यंदा राज्यातून चार हजारहून अधिक सायकलस्वार पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार आहेत. छत्रपती
संभाजीनगरहून शुक्रवारी १० जुलै रोजी जवळपास ६० सायकलस्वार वारीसाठी रवाना होणार
आहेत. यामध्ये १० ते ७९ वर्षे वयोगटातले सायकलपटू, साडे तीनशे किलोमीटर अंतर अवघ्या
दोन दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विजय व्यवहारे यांनी दिली. फाऊंडेशनचं वारीचं
हे पाचवं वर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं
नवी
मुंबई
विमानतळावरुन
औषधी
आयात
करण्यास
मंजुरी
दिली
आहे. औषध पुरवठा मजबूत करणं आणि व्यापार प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दृष्टीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही मंजुरी दिली आहे. यासह देशात
औषधी
आयात
करणाऱ्या विमानतळांची संख्या
आता
४२
झाली
आहे.
****
No comments:
Post a Comment