Saturday, 4 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्के वाढ

·      सहकारी संस्थाचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      येत्या २० जुलै ते १३ आँगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन

·      मुंबई महानगर क्षेत्रासह अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

आणि

·      पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला

****

केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्के वाढ केली आहे. आता हे दर १ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटलवरून २ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या २०२५-२६ च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात कांद्याचं उत्पादन ३०७ लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या कांद्याचा साठा पुरेसा असून, कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्हं नाहीत, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कांद्याची निर्यातही सामान्य असून, या वर्षी जून महिन्यात सुमारे १ लाख ५० हजार मेट्रीक टन कांद्याची निर्यात झाली आहे.

****

 

खरेदी किंवा वारसा हक्काने २०१९ च्या अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभांपासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा या संघटनेनं दिला आहे.

****

नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थाचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आज मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकारक्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने आखलेली आहेत असं फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरु करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं.

****

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं २३ पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैशे मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्रं पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात नमूद आहे.

****

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय असून, त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शक असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन संदेशात तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक असल्याचं म्हटलं आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते १३ आँगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यानी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.

****

राज्यात परवा सहा तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई महानगर क्षेत्रासह पुण्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात आज शाळा बंद होत्या. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. या भागातील नागरिकांना दर तीन तासांनी खबरदारीबाबत माहिती संदेश पाठवले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी दिली होती. दरम्यान, शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक भागात पाणी साचलं तर ६ ठिकाणी झाडं उन्मळून पडली.

 

पालघर जिल्ह्यातही दमदार पावसामुळे नाले भरुन वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर गेलेले सहा पर्यटक खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. किल्ल्यावरुन परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटलेल्या या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरुप बाहेर काढलं.

 

नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रातही आज जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे गंगापूर धरणात १८ दश लक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे.

रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

रायगड जिल्ह्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता सहा जुलैपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 

धुळे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात अरुणावती नदीला पूर आला आहे.

 

जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून सुरू असलेला हा भीज पाऊस खरीपातल्या पिकांसाठी पोषक ठरणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाही. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं. सायंकाळी या पालखीचा मुक्काम शहरातल्या कन्हैयानगर परिसरात असून उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळात जालन्याच्या जे. ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुक्कामस्थळी प्रशासनाच्या वतीनं ३०० हून अधिक स्वच्छतागृहं आणि स्नानगृहांसह पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

****

शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात झिरोफाटा इथं दाखल झाली. आज रात्री श्री क्षेत्र त्रिधारा इथे पालखी मुक्कामी आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं उद्या रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला भव्य रिंगण सोहळा सोमवारी हिंगोलीमध्ये होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे तिसरे वर्ष आहे. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका असलेल्या पालखीची सुरुवात केली. ही वारी २२ दिवसांत ५२१ किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहचणार आहे.

****

बीड जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी एका इसमाला सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी तीन वर्ष सश्रम कारावास आणि ८ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. राहुल आदिनाथ बांगर असं आरोपीचं नाव असून, त्याने गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णास उपचार करत असताना मारहाण केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी आज मतदान झालं. बँकेच्या २१ संचालकांपैकी ८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १३ संचालकांसाठी आज मतदान घेण्यात आलं.

****

पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ६ जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यरथया फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होणार आहे.

****

भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी ट्वेंटी सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होणार आहे. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...