Saturday, 25 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      नीट प्रकरणी सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालयं निश्चित

·      पेपरफुटी प्रकरणी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी;एनटीएतल्या ४७ अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

आणि

·      आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा;धाराशिवचे माने दांपत्य ठरले मानाचे वारकरी

****

नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था-एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना केली. तसंच, प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रांतील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

****

या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेलाही सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं दोन विशेष न्यायालयं निश्चित केली आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथले अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. व्ही. पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे.

****

केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये काल २ तास चर्चा झाली. आज चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कालच्या चर्चेत सीजेपीच्या प्रतिनिधींनी तीन मागण्या केल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. ते म्हणाले….  

बाईट -  केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा

****

पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी बोलतांना, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणीप्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १ कोटी रुपये आर्थिक मदत, अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं सांगितलं. यापैकी दोन मागण्यांवर सरकार अनुकूल असल्याची माहिती दास यांनी दिली

****

पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषींवर अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशा प्रकरणात १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि १० वर्षांपर्यतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सुत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात ५ ते १० वर्षांची कैद आणि १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक आणि कायदेशीर तरतुदी असलेले हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा संस्था-एनटीए मध्ये कार्यरत ४७ अधिकारी कर्मचाऱ्यांना काल पदमुक्त करण्यात आलं. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांचा गदारोळ कालही कायम होता. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सलग पाचव्या दिवशी बाधित झालं.

****

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

****

आषाढी एकादशीचा सोहळा आज साजरा होत आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने, आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती माने यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसंच विविध दिंड्यांना 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यात पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा, ही मागणी पांडुरंगाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे तीस लाखांवर भाविक आल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची दर्शनरांग २५ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व यात्रेकरुंच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा मांडला. पंढरपूर कॉरीडॉरमध्ये शंभर टक्के नागरिकांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा काल पंढरपूर इथं समारोप झाला

मुख्यमंत्र्यांनी काल पंढरपूर इथं कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातही मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप वापरावं, असं आवाहन त्यांनी केलं. एआय आधारित हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले…. 

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांत वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जवळील पंढरपूर इथल्या विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल महापूजा करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने अनेक दिंड्या मंदिर परिसरात दाखल होत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आणि साहित्यिक संवाद कार्यक्रमात बोलत होते. या केंद्राबाबत माहिती देतांना सामंत म्हणाले...

बाईट-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

ऑरिक सिटी सभागृहात उद्योग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सामंत यांनी काल जाणून घेतल्या. विविध उद्योजकांची बैठक घेऊन सामंत यांनी काल संवाद साधून, प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.

****

प्रशासनाने लोकाभिमुख, गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं, विशेष सखोल पूनरीक्षण अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.   आयटीआय संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं काल 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान' काल पार पडलं. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

धाराशिव जिल्ह्यात सध्या दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असून ७५ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २७६ मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात तर सर्वात कमी १०७ मिलीमीटर पाऊस लोहारा तालुक्यात नोंदवला गेला आहे.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा १० किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

****

ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताच्या झंडूकुमार याने पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात १९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावलं.

****

हवामान 

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने आता उसंत घेतली आहे. मात्र जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पामधून सुमारे ८२ हजार ६०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या ६६ हजार १५३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक होत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...