Tuesday, 21 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या खासदरांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्यासाठी अशा बैठका परंपरेनुसार संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी आयोजित केल्या जातात. ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए संसदीय पक्षाला विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर संबोधित केल्याचं, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांत देशाने साध्य केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली आणि विविध देशांशी करण्यात आलेल्या मुक्त व्यापार करारांविषयी अवगत केल्याचंही, रिजिजू यांनी सांगितलं.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी मांडली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेसाठी घेतलं जाणार आहे. या विधेयकाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करणाऱ्या १९५६ च्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'राष्ट्र गौरव अपमान निवारण (दुरुस्ती) विधेयक, २०२६'  विचारविनिमयासाठी मांडणार आहेत.

****

राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राजमार्ग यात्रा अॅपमध्ये दोन नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. डिजिटल लोकल पास आणि मार्गमित्र हेल्पसेंटर या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल लोकल पासच्या माध्यमातून पात्र वाहनधारकांना मासिक पथकर परवाना थेट राजमार्ग यात्रा अॅपवरून ऑनलाइन काढता येणार आहे. यासाठी टोल प्लाझावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या ही सुविधा दिल्ली परिसरात सुरू झाली असून, येत्या काही महिन्यांत देशभरातल्या इतर टोल प्लाझांवरही ती उपलब्ध करण्यात येणार आहे. मार्गमित्र हेल्पसेंटर या स्मार्ट डिजिटल सहाय्य मंचाच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती मिळवणं, तक्रार नोंदवणं आणि मदत मिळवणं अधिक सोपं होणार आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात तसंच बालकांमध्ये त्यांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राज्यभर राबवण्यात येणार असल्याची घोषणा, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. राज्य बाल हक्क आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. यावेळी बालकांच्या मानसिक आरोग्य, मूल्यसंस्कार आणि जीवनकौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मानस’ पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं, तसंच पालघर जिल्ह्यातल्या ५० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या ‘मानस’ मानसिक आरोग्य कीटचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपारिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी तीन वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी सलग्न एक हजाराहून अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्याने हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं येत्या सहा आणि सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. शिबिरात विविध तज्ज्ञ विभागांमार्फत मोफत तपासणी, निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या उस्तुरी, बडूर शिवारात हरणांच्या वाढत्या उच्छादामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेलं सोयाबीनचं कोवळं पीक हरणांकडून फस्त केलं जात असल्याने मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या असून, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हरणांचा बंदोबस्त करण्यासाठी, पिकांचं संरक्षण करण्यासाठी तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी वन विभागाने तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.

****

रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलिसांनी विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणारे, सीट बेल्टचा वापर न करणारे वाहनचालक तसंच ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...