Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता; युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरणही मंजूर
· भारत- युके मुक्त व्यापार करार आजपासून लागू; याअंतर्गत मुंबईत विविध वस्तूंच्या आयात–निर्यातीला सुरवात
· साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या वीजेचं शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी
रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
आणि
· नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून
सुरू
****
६२ हजार ५०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन
उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.
ही योजना पुढील पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार असून, याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर सव्वा दोन ते पाच
टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास दीड टक्क्यांपर्यंत
अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे ३९ लाख कोटी रुपयांच्या मोबाईल
फोनचे उत्पादन होण्याची अपेक्षा असून, ६० हजार जणांना थेट रोजगार
मिळणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
ते म्हणाले
-
बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
भारताच्या सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी
मंत्रिमंडळाने सेमीकॉन 2.0 ला मंजुरी दिली असून, त्यासाठी
एकूण एक लाख २७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर
नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं, हे याचं उद्दिष्ट आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळाने युरिया राष्ट्रीय गुंतवणूक
धोरण-२०२६ मंजूर केलं. देशात गॅस-आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया
क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून, आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
****
भारत- युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून
लागू झाला. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून यूकेमध्ये होणाऱ्या ९९ टक्के निर्यातीवर
कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज
मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त
हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत आज मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या
आयात निर्यातीला सुरवात करण्यात आली.
भारत आणि यूकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे
आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर
प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दिली.
हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण
उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या
गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं
आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर
मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित
गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात
हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे.
****
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानं दिल्लीतील लाल किल्ला
आजपासून १५ ऑगस्ट पर्यंत नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
स्वातंत्र्यदिन २०२६ सोहळ्याच्या तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा
निर्णय घेण्यात आला.
****
साडेसात अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या वीजेचं शेतकऱ्यांचं ४८ हजार
कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
आहे. मुंबईत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान
मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज कर्जमाफीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना ९५ हजार कोटी रूपयांचं सहाय्य
दिलं जात असून,
शेतीक्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य
सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून
जाणारं पावसाचं पाणी गोदावरी, तापी खोऱ्यांत यावं यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे २४ नवी धरणे आणि
१६ जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच, दरवर्षी
पुरामुळे वाहून जाणारं २०० टीएमसी पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून
मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण
तयार करणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुंबईत आज बियाणे
तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित
करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. साथी पोर्टलचा प्रभावी वापर, क्यू आर कोडद्वारे बियाण्यांचा मागोवा, स्रोत
बियाण्याची पडताळणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, ई-लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, तसंच
परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर विशेष तपासणी यांसारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात
समावेश करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान
सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्स्प्रेसचं बोईंग
७३७ मॅक्स ८ हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबू धाबीसाठी रवाना झालं. सुमारे शंभर प्रवासी
असलेलं हे विमान अडीच तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून
पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. टाळ-मृदंगाच्या
गजरात,
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या
जयघोषात पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा पार
पडला. आजपासून पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात असून, आजचा मुक्काम लोणंद इथं आहे.
दरम्यान, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या
पालखीचा मुक्काम आज बारामती इथं आहे.
****
शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव
शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. तसंच रस्त्याच्या
दुतर्फा रांगा लावत पालखीचे दर्शन घेतले. आज धाराशिव शहरात मुक्काम करुन उद्या ही पालखी
तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने अकोला इथं
आजपासून राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेला सुरूवात झाली. याअंतर्गत आमदार रणधीर सावरकर
यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण हे राष्ट्रीय
कर्तव्य समजून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असं
आवाहन आमदार सावरकर यांनी केलं. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा
फड यांनी आज महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा
घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेने
अध्यापन करावं,
अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला
सुरुवात झाली. १९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटांतले ९७०
हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
राज्यात बहुतांश भागात आज पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात
मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद,
दौलताबाद याठिकाणीही पाऊस सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment