Thursday, 23 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा

·      संसदेचं कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प;सरकारकडून चर्चेसाठी दरवाजे खुले

·      आंदोलकांवर कारवाईच्या निषेधात पुकारलेल्या बंदला विभागात संमिश्र प्रतिसाद

·      महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी-विजया रहाटकर यांचं प्रतिपादन

आणि

·      पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

****

पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणारे किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे.

 

दरम्यान, शिक्षणपद्धतीतल्या मूलभूत दोषांवर जलदगती न्यायालयं स्थापन करणं हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही या पक्षाने केली आहे.

****

या प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं, पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. चर्चेच्या माध्यमातूनच ही कोंडी फुटू शकते, असं डॉ सिंह यांनी नमूद केलं. यासाठी सरकारच्या वतीने आतापर्यंत आंदोलकांना चार वेळा चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याचं, सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह

****

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आजही संसदेच्या दोन्ही सदनात केलं.

 

राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी १२, नंतर २ वाजेपर्यंत आणि त्यानंतर तीन वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिल्याने. उपसभापती हरिवंश यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

 

लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत नंतर २ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

नवी दिल्लीत सीजेपीनं संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

****

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल, असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी २ तास मौनव्रत आंदोलनही केलं.

****

दरम्यान, या संदर्भात मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत १८ ते २२ जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून १३ प्राथमिक माहिती अहवाल दाखल असून ४०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीने येत्या २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

****

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

 

छत्रपती संभाजीनगर इथंही अनेक भागातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद दिसून आली. लातूर शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. नांदेड इथेही वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. हिंगोली शहरासह, सेनगाव, वसमत, आखाडा बाळापूर, कळमनुरी, डोंगरकडा इथल्या व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. जालना जिल्ह्यात व्यापारी वर्ग आणि शैक्षणिक संस्थांनी बंद पाळला. परभणीतही बाजारपेठा बंद होत्या तर काही शाळांनी सुट्टी जाहीर केली होती.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद  यांच्या जयंती निमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहिली आहे.

****

राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै १९२७ या दिवशी देशात मुंबईतून नभोवाणीचं पहिलं प्रसारण झालं. ८ जून १९३६ या दिवसापासून ही सेवा ‘ऑल इंडिया रेडिओ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. १९५६ मध्ये याचं नामकरण ‘आकाशवाणी’ असं करण्यात आलं. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत, आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे.

****

महिलांची सुरक्षा सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संवेदनात्मक भूमिकेतून पाहिलं जावं, असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. आज पुण्यात यशदा इथं पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाठलाग आणि सायबर पाठलाग हा दंडनीय गुन्हा असून, महिलांनी या समस्येचा प्रतिकार करून वेळीच तक्रार दाखल करावी, असं रहाटकर यांनी सांगितलं

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी भागातली बांधकामं नियमित करून घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन, आपली बांधकामं नियमित करून घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे.

बाईट - विभागीय आयुक्त जी श्रीकांत

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेते फेरीवाल्यांसाठी आयोजित बहुप्रतिक्षित निवडणूक प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शनिवारी २५ जुलै २०२६ रोजी होणारे मतदान आता पुढील आदेशापर्यंत होणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

****

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येत आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी पुढे येणाऱ्या कुटुंबांची माहिती गोळा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी इथे सामाजिक वनीकरणाच्या वतीनं आयोजित वन महोत्सवाचं आज उद्घाटन झालं. या वन महोत्सवानिमित्त ‘रोपे आपल्या दारी’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण करणाऱ्यांना रोपं पुरवली जाणार आहेत.

****

भारत आणि झिम्बॉब्वे संघातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून झिम्बॉब्वेत हरारे इथं प्रारंभ झाला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बॉब्वे संघाच्या वीस षटकांत सात बाद १२५ धावा झाल्या होत्या.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासंदर्भात आज आढावा बैठक घेतली. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्याची सूचना भोसले यांनी केली आहे.

****

हवामान 

नाशिक शहरासह जिल्ह्यात गोदावरीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात पूल पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटला. सुरगाणा तालुक्यात भोरमाळ इथे एक ४२ वर्षीय इसम पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ९० टक्के भरल्याने नांदूर मधमेश्वरमधून दुपारी ५५ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. विशेषतः पुणे तसंच नाशिक जिल्ह्यात घाटमाथा परिसर, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...