Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
·
संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून
·
अधिवेशन कामकाज सुरळित चालण्यासाठी सरकारचं विरोधी पक्षांना
सहकार्याचं आवाहन
·
मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा हवामान खात्याचा अंदाज
आणि
·
पी. व्ही. सिंधूनं पटकावलं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं
अजिंक्यपद
****
संसदेचं
पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण
मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत,
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं
कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती
केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित
केल्याच्या निषेधार्थ, विरोधी
पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत
सहभागी झाले.
****
केंद्रीय
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उद्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं
कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
माध्यमांशी बोलताना रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना या पावसाळी अधिवेशनाचं
कामकाज सुरळीत चालावं यासाठी योगदान देण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
रिजिजू म्हणाले की, संसद
जितक्या अधिक कार्यक्षमतेनं चालेल, तितकं ते देशासाठी अधिक चांगलं ठरेल. सततच्या गोंधळामुळं
यापूर्वी संसद चालवणं खूप कठीण झालं होतं, याची आठवण त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना करून दिली.
सरकार विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकण्यास तयार आहे आणि त्यांनीही सरकारचं म्हणणं
ऐकावं, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज ठप्प केल्यामुळे सर्वांचा वेळ वाया
जातो आणि करदात्यांच्या पैशांचाही अपव्यय होतो, असं रिजिजू म्हणाले.
****
५८व्या
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ स्पर्धेत ऐतिसाहिक कामगिरी बजावताना
भारतातर्फे सहभागी चारही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं पटकावली आहेत.
उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं या स्पर्धेचा आज समारोप झाला. ओडिशाच्या भुवनेश्वरचा
देबदत्त प्रियदर्शी, पंजाबच्या
मंडी गोबिंदगढचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणा हैदराबादच्या संदीप कुची
यांनी सुवर्णपदकं मिळवली आहेत. ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६
स्पर्धेतही भारतीय संघानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटकावली. लिथुआनियातील
विल्नियस इथं आज या स्पर्धेचा समारोप झाला. हरियाणाच्या भाव्या गुंवालला सुवर्णपदक,
पश्चिम बंगालच्या सौमिल मैती,
राजस्थानच्या निशित कलानी आणि
पंजाबच्या अनमोल कुमार यांना यात रौप्य पदकं मिळाली.
****
जम्मू-काश्मीर
मधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित
करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर
यात्रा पुन्हा सुरु केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागढ जिल्ह्यात
सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद
ठेवण्यात आला.यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात
आलं आहे.
****
हवामान
विभागानं पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस,
विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४०
किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मराठवाडा,
विदर्भ,
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील
अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज यात आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल वीस
दिवसांच्या खंडानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं
शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूयात आमच्या वार्ताहरानं दिलेली
माहिती -
बाईट – रमेश कदम, हिंगोली
****
आषाढी
वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं आज
सोलापूरातल्या धर्मपुरी इथं भक्तिमय आणि टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन झालं. यावेळी
ग्रामविकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या
उत्साहानं स्वागत केलं. पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. धर्मपुरी इथं जिल्हा
प्रशासनानं वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवली आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं वारकरी
भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान,
पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांची
पालखी आज परांडा इथून बीटरगावकडे मुक्कामी रवाना झाली आहे.
****
नीट-युजी
पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागानं आज दुसऱ्या दिवशीही आरोपी
शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसची चौकशी केली. दोन महिन्याच्या खंडानंतर
कालपासून सीबीआयच्या पथकाकडून पुन्हा एकदा ही चौकशी करण्यात येत आहे.
****
सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत मुंबई
विभागातल्या ८०० पात्र लाभार्थ्यांसाठी बिहारमधील बोधगया येथे विशेष तीर्थयात्रा
रेल्वेसेवा देण्यात येत आहे. ही विशेष रेल्वे उद्या दुपारी दोन वाजता दादर
स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरुन प्रस्थान करणार आहे. राज्यातल्या
नागरिकांना देशात ऐतिहासिक, धार्मिक
आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचं दर्शन घडवून आणणं,
तसंच समाजातल्या विविध घटकांना
अध्यात्म, सांस्कृतिक
वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती देणं हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा
प्रमुख उद्देश असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.
****
दोन
वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनं आज प्रथमच जपान खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय
बॅडमिंटनपटू ठरली. अंतिम सामन्यात तिनं यजमान देशाच्या आणि तीन वेळा विश्वविजेत्या
अकाने यामागुची हिचा २१-१७, २१-१७
अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत चेन यूफेईचा पराभव करून स्पर्धेच्या
अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. सिंधूनं यापूर्वी २०२४ मध्ये
सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं. २०१९ मध्ये जागतिक
अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतरचं हे तिचं सर्वात मोठं यश ठरलं आहे.
****
इंग्लंडनं
भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दमदार सुरूवात मिळवली आहे. लॉर्डस
मैदानावर सुरू या सामन्यात जेकब बेथलनं ९१ धावा काढताना बेन डकेटसह १९१ धावांची
भक्कम सलामी दिल्यानं संघानं ३३ षटकांत एक बाद २०६ धावा केल्या आहेत. भारतानं या
सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेत सध्या एक–एक
अशी बरोबरी असल्यानं ही लढत निर्णायक आहे.
****
कोण
जिंकणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, अर्जेंटिना की स्पेन, हे आज निश्चित होणार आहे. न्यूयॉर्क न्यू जर्सी
क्रीडासंकुलामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता
फुटबॉलप्रेमींमध्य मोठी उत्सुकता असलेला हा सामना खेळला जाईल. या स्पर्धेचं तिसरं
स्थान इंग्लंडनं पटकावलं आहे. मियामी इथं काल तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या
सामन्यात इंग्लंडनं फ्रांसवर ६-४ अशी मात केली.
****
प्रहार
जनशक्ती पक्षानं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बियाणं निर्मिती खासगी कंपनीसमोर
मशाल आंदोलन केलं. या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे
शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप कार्याकर्त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी आंदोलक
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
****
छत्रपती
संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणिसंग्रहालय दिवाळीनंतर मिटमिटा इथल्या
नव्या जागेत स्थलांतरित करण्याच्या उद्देशानं तयारी करण्याच्या सूचना महापालिका
आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या
माध्यमातून मिटमिटा इथं शंभर एकर जागेत हे प्राणिसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या
ठिकाणी प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार केले जात असून आतापर्यंत आठ हजार
झाडांची लागवड करण्यात आली अहे. वन्यजीव स्थलांतर परवानगी घेण्यासाठी या महिन्या
अखेरीस केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला अर्ज करण्यात येणार असल्याचंही
आयुक्त येडगे यांनी म्हटलं आहे.
****
मतदान
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांच्या गृहभेटीद्वारे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार
आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरूनच कामकाज करावं,
इतर कोणत्याही ठिकाणी कामकाज करू
नये, असे
आदेश जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज दिले
आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गरीब कुटुंबाना घरकूल मंजूर होऊनही,
स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या
३४ गावांतील एक हजार वीस लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासन जागा उपलब्ध करून देणार
असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण
करण्यात येणार असून त्यानंतर राजस्व अभियानात या लाभार्थ्यांना जागा वाटपाचं पत्र
देण्यात येणार आहे, असं
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment