Wednesday, 15 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी

·      दुबार पेरणीची वेळ आल्यास, शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय

·      राज्यातल्या धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठा, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस

·      पंढरपूरमध्ये उद्यापासून २४ तास दर्शन सुविधा

आणि

·      राज्य शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षेत दहावीचे २९ टक्के तर बारावीचे ३९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथील करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. २०१९ च्या कर्जमाफी योजनेतल्या सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी देण्याचा तसंच वर्ष २०२६-२७ मधली नियमित परतफेडीची अट रद्द करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं.

राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे, यामुळे शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणं शक्य होईल.

राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपररिषदा आणि नगरपंचायतींना मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि चांगले उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येतील.

कारागृहांमधल्या मुक्तबंदी आणि परिविक्षाधीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदान योजनेच्या रक्कमेत दुप्पटीनं वाढ करत ते पन्नास हजार रुपये करण्याचा तसंच निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.

बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निधीतून क्रीडा संकुलात सिंथेटीक अॅथलेटीक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो यासाठीची मैदानं, रेनवॉटर हार्वेस्टींग अशी कामं करता येणार आहेत.

**

बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास, शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले:

बाईट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या तीन हजार नऊ धरणांमध्ये सुमारे ६३३ टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या ८४३ टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे.

राज्यातल्या सहा महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक ८६ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर ६६ टक्के, कोकण ६२, पुणे ५१, अमरावती ४२, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमधे ४० पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमधे जायकवाडी धरणात ३२ टक्के, कोयना धरणा ४९ टक्के, उजनी ५० टक्के, गोसीखुर्द ३६ टक्के, तर खडकवासला धरण समूहात ४१ टक्के पाणीसाठा आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात, आतापर्यंत राज्यात ३३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो ९६ टक्क्यांच्या आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. बारा जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, तर अन्य १२ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळापुढे काल झालेल्या सादरीकरणानुसार, ९६ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे.

**

शेतकऱ्यांनी तूर किंवा बाजरीच्या पेरणीला प्राधान्य द्यावं, तसंच उगवून आलेल्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले:

बाईट- कृषी विकास अधिकारी डॉ प्रकाश पाटील

****

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर इथं भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचं नियोजन अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी येत्या सोळा तारखेपासून पददर्शन सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान सुमारे दोन हजार पाचशे मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने R3, म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका काल जारी केली. त्यानुसार, सीबीएसईअंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववी मध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना दहावी मध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी दहावीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. इयत्ता आठवी मधली तीन भाषांची निवड इयत्ता नववी मध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड 'R3' म्हणून करावी लागेल, असं सीबीएसईनं स्पष्ट केलं.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी तसंच १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्यभरातून दहावीचे फक्त २९ पूर्णांक ५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावी परीक्षेत हे प्रमाण ३८ पूर्णांक ७२ टक्के इतकं आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागाचा दहावीचा निकाल ३४ पूर्णांक २७ टक्के, तर बारावीचा निकाल सुमारे ५३ टक्के लागला आहे. लातूर विभागाचा दहावीचा निकाल ३४ पूर्णांक ५५ टक्के तर बारावीचा निकाल ४६ पूर्णांक ५३ टक्के इतका लागला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ च्या पिकविमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेला निर्णय केंद्रीय समितीनं कायम ठेवत पीकविमा कंपनीचं अपील फेटाळून लावलं आहे, पुढील सात दिवसात पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात ३३७ कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश समितीनं दिले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. खरीप २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी एकूण ५०४ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले होते. त्यापैकी ५६ महसूल मंडळांतल्या ३६८ प्रयोगांवर विमा कंपनीनं आक्षेप घेत आधी राज्य आणि नंतर केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती.

****

लातूर जिल्ह्यातल्या शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ३० जुलैपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी दिले.

****

विशेष मतदार यादी पुनरीक्षण, एसआयआर मोहिमेत कन्नड तालुक्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

या मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनानं त्यांचं विशेष कौतुक केलं.

****

संत नामदेव महाराज तसंच संत जनाबाई यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन होत आहे. योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यातर्फे या पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजेदरम्यान होणाऱ्या या स्वागत समारंभात पालखीचा अश्वरिंगण सोहळा होणार आहे.

**

वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी काल धाराशिव जिल्ह्यात कळंब शहरात दाखल झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत १५ दृष्टिहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी ५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...