Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २२ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज
त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना
आदरांजली वाहिली. समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार यांच योगदान
उल्लेखनीय होतं,
राज्यातलं एनडीए सरकार त्यांच्या विकासदृष्टीची पूर्तता
करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात
म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना जयंतीनिमित्त
अभिवादन केलं.
****
मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे.
यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यार येत
आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रांत विकासाची नवी
शिखरे गाठत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
सांगली अपर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि
तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात
आलं.
****
आयएनएस मालवण ही पाणबुडीरोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात
समाविष्ट करण्यात आली. कर्नाटकातील कारवार इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी
सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं. देशाच्या
स्वदेशी जहाजबांधणी उपक्रमातील हा आणखी एक महत्वाचा टप्पा आहे. नौदलाचे वरिष्ठ
अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत, जुलै
महिन्याच्या सुरवातीपर्यंत एकदंर सुमारे ५८ कोटिंहून अधिक जनजधन खाती उघडण्यात आली
आहेत. राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही
माहिती दिली. यापैकी ३२ कोटिहून अधिक जनधन खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात
उघडण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी
राज्यातल्या सर्व राज्य विद्यापीठांमधले क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा
संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात, खेळ
अतिशय स्पर्धात्मक झाले असून, त्यात व्यावसायिकता आली आहे; या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीड़ा प्रकारांना पोषक वातावरण तयार
करुन देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी
केलं.
****
आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या
पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुडूसफाटा इथं पार पडलं तर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज
रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडीशेगांव आणि पिराची कुरोली इथल्या
पालखीतळावर आहे.
****
सहाय्यक बीएलओ म्हणून काम करण्याच्या सक्तीविरोधात
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र
राज्य आशा आणि गटप्रवर्तक कृती समितीने काल मुंबईत आझाद मैदानात निदर्शनं केली.
महिला आणि बालविकास विभागाने यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य कामं देऊ
नयेत,
अशी भूमिका स्पष्ट केली असून सर्वोच्च न्यायालयानेही
त्यांच्या मूळ कामावर परिणाम होईल, अशी अतिरिक्त कामं
देण्याबाबत गंभीर निरीक्षणं नोंदवल्याचं समितीने सांगितलं.
****
रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषि उद्योग फाउंडेशनच्या
संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातल्या टसर इथं विशेष विकास प्रकल्प राबवण्यात
येणार आहे. जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि
उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या
उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
****
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी काल छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाचा सविस्तर आढावा
घेतला. प्रत्येक टप्प्यातली कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, तसंच मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या कामाचं नियमित परीक्षण करून प्रगतीवर
सातत्याने लक्ष ठेवण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली.
बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातील पुनरीक्षण
प्रक्रियेचा आमदार धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.
****
लातूर इथल्या विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने कातपूर
इथं जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत काल
जनजागृती करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन
ॲग्री लिमिटेडच्या संचालक अदिती देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम
राबवण्यात आला.
****
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत पी व्ही
सिंधू आणि उन्नती हुडा या दोन भारतीय खेळाडुंमध्ये सामना होणार आहे. पुरुष एकेरीत
आज झालेल्या सामन्यात भारताच्या आयुष शेट्टीने इंडोनेशियाच्या ए फरहान याचा २१-१७, पाच-२१,
२१-१७ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment