Monday, 27 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक, २०२६ सादर करण्यात येणार असून, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे विधेयक मांडणार आहेत.  हे विधेयक सादर होत असताना सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्याचं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. पेपरफुटीच्या आरोपींवर जलदगतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याची अपेक्षा असून, परीक्षांमधल्या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान ५ ते कमाल १० वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित आहे. संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत किमान सात वर्षांची शिक्षा आणि १० कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

****

माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि एअरोस्पेस अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या डॉ. कलाम यांनी तब्बल चार दशकं डीआरडीओ आणि इस्रो या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला. २००२ मध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. कलाम यांना आदरांजली वाहत, ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ते देशवासीयांसाठी कायम आदर्श राहतील, असं म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना त्यांनी नवी उंची मिळवून दिली आणि त्यांची ही कामगिरी भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली असल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप आजपासून ‘कलाम को सलाम’ या विशेष देशव्यापी मोहिमेची सुरुवात करणार आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी चर्चासत्रं आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे.

****

केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. २७ जुलै १९३९ रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील महत्त्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत नरिमन पॉइंट इथं ‘आयकर सिंधू’ या आयकर कार्यालय संकुलाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी कर प्रशासनात नागरिककेंद्री दृष्टीकोन, कार्यक्षमता आणि पारदर्शकतेवर भर दिला. अधिकार्यांनी कर्तव्य बजावताना सचोटीला मार्गदर्शक तत्व मानावं, असं आवाहन त्यांनी केलं. नियमानुसार सर्व प्रक्रियांचं पालन करताना, नागरीकांच्या दाव्यावर अनावश्यक विलंब न करता कार्यवाही झाली पाहिजे, असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

****

मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी २०२६ निमित्त विकसित करण्यात आलेल्या 'आरोग्यसंपन्न वारी' वेब ॲपला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक लाख आठ हजार ३८ वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा लाभ घेतला असून, वारीदरम्यान आवश्यक आरोग्य सेवा आणि इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्हावा तसंच आवश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने हे वेब ॲप प्रभावी ठरलं.

****

परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘सिल्क आणि मिल्क’ योजना तसंच ‘मेरा रेशीम मेरा अभियान’ यावर विशेष कार्यशाळा काल घेण्यात आली. रेशीम आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘सिल्क आणि मिल्क’ योजना राबवणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लवकरच रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. या कार्यशाळेला कुलगुरू डॉ. इंद्र मणी, जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

****

नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून चार हजार ९४७, दारणा धरणातून १३ हजार २५०, तर नांदूर मधमेश्वरमधून ४६ हजार २२७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे.

पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५५ पूर्णांक ४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...