Wednesday, 29 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज बाधित झालं.

लोकसभेचं कामकाज सुरु होताच, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवल्याबद्दल भारोत्तोलक हरजिंदर कौर आणि ॲथलिट गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या मुद्यावरुन विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. सतत गोंधळ घालून सदनाचं कामकाज न होऊ देणं, हे संसदेच्या परंपरेला अनुसरुन नसल्याचं बिर्ला म्हणाले. त्यांनी सदस्यांना कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा करण्यात येत असून, यंदाची संकल्पना "स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" अशी आहे.

भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये वन विभागातले कर्मचारी, वैज्ञानिक आणि संवर्धनवाद्यांच्या अथक प्रयत्नांचा आणि समर्पणाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासोबतच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी भारताची कटिबद्धता कायम असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

वाघांचं संरक्षण करण्यात भारत यशस्वी ठरला असून, जगातले ७५ टक्के वाघ हे भारतात असल्याची माहिती वन आणि पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली. देशात ५८ अभयारण्यात ३ हजार ६८२ वाघ आहेत, सरकार वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या परिसंस्थासाठी कटिबद्ध असल्याचं यादव यांनी संदेशात म्हटलं आहे.

व्याघ्र दिनानिमित्त आज नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. राज्यात व्याघ्र संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येणार आहे.

****

गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. आपल्या जीवनप्रवासात ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

उपराष्ट्रपती सी. पी, राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञान, मूल्य आणि योग्य वर्तन यासाठी आपल्या संस्कृतीत गुरु हे मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

गुरु शिष्याला केवळ ज्ञान देत नाहीत तर त्याच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आपल्या आदर्शांना जीवनातील शक्तिंचा स्रोत बनवा असं त्यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात नमूद केलं.

गुरूपौर्णिमेनिमित्त राज्यभरातल्या विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगाव मधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यासह राज्यभरातल्या सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती, सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

****

'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचं मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असून, राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन करण्यात येणार आहेत. नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सातत्यानं जनजागृती केली जाणार आहे. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचा शुभारंभ आज होणार आहे. केंद्र शासनानं २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे.

****

बीड इथल्या भगवान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळात आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचावं आणि समाजाच्या विकासात योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डॉ. वहाब सय्यद यांनी यावेळी केलं.

****

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या २७ हजार ५८२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी दाखल होत असून, पाणीसाठा ६६ पूर्णांक ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...