Thursday, 23 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौथ्या दिवशी बाधित झालं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासात इतर कोणत्या मुद्यावर बोलता येणार नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. नीट मुद्यावर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्वार त्यांनी केला. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहील्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित झालं.

राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. विरोधकांनी नीट चा मुद्दा उपस्थित केल्यावर, सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच चर्चा केली जाईल, असं सांगितलं. यावरुन झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात आज समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी, युवकांचं भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं नमूद केलं. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना अभिवादन केलं.

****

राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै १९२७ या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीच्या पहिल्या रेडीओ प्रसारणाची सुरूवात झाली. आठ जून १९३६ या दिवसापासून ही सेवा ‘ऑल इंडिया रेडीओ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. १९५६ मध्ये याचं नामकरण ‘आकाशवाणी’ असं करण्यात आलं. ‘बहुजनहिताय, बहुजन सुखाय’ या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत, आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यातल्या क्रमवारीत पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील एकूण १५ लाख ९५ हजार ६४४ मतदारांच्या पुनरीक्षणासाठी आतापर्यंत १५ लाख ३४ हजार ७३७ फॉर्मचं वितरण करण्यात आलं असून, हे प्रमाण ९६ पूर्णांक १८ टक्के इतकं आहे.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम १६ मध्ये महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या वाय एफ चेन हिने सिंधुचा १६–२१, २२–२०, २१–१८ असा पराभव केला. पुरुष एकेरीत अंतिम १६ मध्ये आज भारताच्या आयुष शेट्टीचा सामना व्हिएतनामच्या एन गुएन याच्याशी, तर लक्ष्य सेन चा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्याशी होणार आहे.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ आजपासून सुरु होत आहे. ग्लासगो इथल्या प्रसिद्ध 'द हायड्रो' मैदानावर भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे दहा वाजता या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

****

भारत आणि झिम्बाव्बे यांच्यात तीन सामन्यांच्या टी–ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सामना सुरु होईल.

****

पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, सखल भागात पाणी साचलं आहे. धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्याने सूर्या नदीकाठच्या ६५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असून, गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...